कोल्हापूर : काेरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू असल्यामुळे महानगरपालिका परवाना विभागाने शहरातील दुकानदारांच्या परवाना नूतनीकरणासाठी ३० जूनअखेर मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही मुदतवाढ देण्याची मागणी कोल्हापूर चेंबरने आयुक्तांकडे केली होती.
सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी दि. १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत आपले परवाने नूतनीकरण करण्याबाबत महापालिकेच्या परवाना विभागाच्या वतीने सांगितले होते. परंतु शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी परवाने नूतनीकरण करण्याकरिता दि. ३० जूनअखेर दोन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे.
या कालावधीत कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही. ज्या व्यावसायिकांना अग्निशमन सुरक्षिततेच्या दृष्टीने बी फार्म सादर करणे आवश्यक आहे त्यांनी सदरचा फॉर्म अर्जासोबत सादर करून परवाना नूतनीकरण करावयाचा आहे. शहरातील सर्व परवानाधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन परवाना विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.