कोल्हापूर : अनोख्या संकल्पनेतून स्त्री शक्तीचा सन्मान आणि समाजप्रबोधन करणाऱ्या सत्यम गुजर यांचा विवाह सुप्रिया सुर्वे यांच्याशी शनिवारी सातारा येथे पार पडला. महिलांना प्राधान्य हे या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. तसेच ‘बुके नको पण बुक’ आणाच या आग्रहाला निमंत्रितांतून भरघोस प्रतिसाद मिळाला. सुमारे १२५० पुस्तके यावेळी भेट स्वरूपात आली. या विवाह सोहळ्यात निमंत्रितांना ‘काही वाटा पण खऱ्या...’ या समाजप्रबोधनात्मक ५०० पुस्तकांचे गुजर परिवाराने वाटप केले. स्टेजवरील सजावटीला फाटा देत समाजसुधारक, समाजसेवक, विविध क्षेत्रांतील यशस्वितांच्या प्रतिमा असलेला मोठा डिजिटल बोर्ड उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, बाबा आमटे, मदर तेरेसा, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अण्णा हजारे, किरण बेदी, कल्पना चावला, नाना पाटेकर, सचिन तेंडुलकर ते बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूपर्यंत सर्व क्षेत्रांतील दिग्गजांचा त्यात समावेश होता. या सोहळ्यातील अक्षतांची जागा टाळ्यांनी घेतली आणि उपस्थितांनी त्याचे स्वागतही मोठ्या प्रमाणावर केले. या अनोख्या सोहळ्याचे उपस्थितांनी कौतुक केले. (प्रतिनिधी) १२५० पुस्तके... ‘राणी लक्ष्मीबाई’, ‘राजर्षी शाहू छत्रपती’, ‘भगवद्गीता’, ‘स्वामी विवेकानंद’, ‘पानिपतचा शेवटचा संग्राम’, ‘अग्निपंख’, ‘निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली’, ‘देशभक्तीपर गीत’, ‘आपले उत्सव’, स्टडी प्लॅन अँड जिनिअस मेमरी टेक्निक’, ‘प्रवास एक प्रवासा’साठी अशा विविध विषयांच्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे.
पुस्तकांच्या आहेरला भरघोस प्रतिसाद
By admin | Published: December 26, 2016 12:59 AM