लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोली : शिरोली, नागाव, टोप ही गावे कोरोना ‘हाॅटस्पाॅट’ होती. त्यामुळे या गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांना लस देण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापकपणे राबवा, अशा सूचना प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या.
शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे तीस हजार लोकांना कोविड लसीकरण करण्याचे नियोजन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे. शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, गाव कामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत यांच्याकडून लसीकरणासाठी म्हणावे तितके प्रयत्न व जागृती झाली नसल्याची खंत खरात यांनी व्यक्त केली. प्रत्येक दिवशी सुमारे तेराशे लोकांचे लसीकरण करणे आवश्यक असताना, फक्त ५१० इतक्याच लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. हा आकडा अत्यंत कमी असून, कामात कोणताही हलगर्जीपणा करू नका, या शब्दात प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुनावले.
कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत असून, त्यांना नोटीस बजावून निलंबित करा, अशा सूचना डाॅ. खरात यांनी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी व तहसीलदार डॉ. प्रदीप उबाळे यांना दिल्या. यावेळी तहसीलदार डॉ. प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कोरे उपस्थित होते.