कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील नागाव येथील व्यापाऱ्याची ८० लाख १३ हजार रूपयांची रक्कम लुटीचे रॅकेट येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरूवारी उघड केले. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.प्रॉपर्टी एजंट सुकुमार उर्फ बबलू हंबीरराव चव्हाण, गवंडी कामगार राहूल अशोक कांबळे, पोपट सर्जेराव चव्हाण ( रा. निगवे दुमाला, ता. करवीर), चप्पल दुकानदार संजय आप्पासाहेब शिंदे ( रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले), राहूल बाबुराव मोरबाळे ( रा. हुपरी, ता. हातकणंगले), जगतमान बहादूर सावंत, रमेश करण सोनार ( दोघे सध्या रा. गांधीनगर, मूळ गाव : लमकी, नेपाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी सांगितले की, नागाव येथील व्यापारी धनाजी आनंदा मगर हे व्यापारी आहेत. ते १९ ऑक्टोबर २०२२ रोजी ८० लाख १३ हजार घेवून गांधीनगर येथून दुचाकीवरून गावी जात होते. त्यावेळी चार अनोळखी लोकांनी त्यांची दुचाकी मुक्तसैनिक वसाहत येथे अडवली. त्यांनतर संशयित आरोपी मोरबाळे याने मी इनकमटॅक्स अधिकारी असल्याचा बहाणा करून तुमच्याकडे पैसे किती आहेत, असे विचारणा करून मगर यांना एमआयडीसीच्या दिशेने घेवून गेला.
तिथे संशयितांनी संगनमताने मगर यांच्याकडून पैशाची बॅग काढून घेतली. त्यानंतर मगर यांना हायवेवर सोडून ते निघून गेले. यातील लुटीच्या पैशाचे पुरावे आतापर्यंतच्या पोलीस तपासात मिळालेले नाहीत. त्यामुळे ही रक्कम हवाल्याची असल्याचा संशय पोलिसांना आला आहे. पोलीस त्या दिशेेने तपास करीत आहेत. अजूनही या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.