कोल्हापूर : काही बलात्कारी आणि दारुड्या गुरुजींमुळे (शिक्षक) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. यामुळे संबंधित अशा शिक्षकांसंबंधी प्रशासनाने स्वत:हून कारवाई करावी आणि त्यांची हकालपट्टी करावी, असा सूर मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत निघाला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांना धारेवर धरण्यात आले. येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात २२ रोजीची तहकूब सभा अध्यक्षा विमल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. शाहूवाडी तालुक्यातील एका शिक्षकाने एका महिलेवर बलात्कार करून क्लिप तयार करून ती प्रसारित केली आहे. त्यावर काय कारवाई केली, असा सवाल बाजीराव पाटील यांनी उपस्थित केला. याच विषयावर धैर्यशील माने म्हणाले, त्या शिक्षकासंंबंधी पीडित महिलेची तक्रार नाही, या कारणास्तव कारवाई करण्यास दिरंगाई करू नये. बलात्कारी शिक्षकावर काहीही कारवाई होत नाही, असा चुकीचा संदेश समाजात जात आहे. समाजात शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. यामुळे शिक्षण प्रशासनाने स्वत:हून कारवाई करावी. शिक्षण सभापती अभिजित तायसेटे म्हणाले, पीडित महिला मतिमंद नाही. ती विवाहित आहे. त्या शिक्षकाचे आणि त्या महिलेचे ‘खासगी संबंध’ आहेत. महिलेकडून लेखी तक्रार नसल्याने कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. शिक्षणाधिकारी चौगुले म्हणाले, प्रशासकीय कामातील कसुरी शोधून त्या शिक्षकावर कारवाई प्रस्तावित केली आहे. त्या शिक्षकास ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे. सदस्य राजेंद्र परीट यांनी बलात्कारी आणि दारुड्या शिक्षकांची चंदगड तालुक्यातच नियुक्ती का करता, असा सवाल उपस्थित केला. निकृष्ट व अवेळी भोजनशिंगणापुरातील निवासी क्रीडा प्रशालेतील विद्यार्थ्यांना अवेळी आणि निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जाते. यासंबंधी तक्रार केल्यास संबंधित ठेकेदार अरेरावी आणि शिवीगाळ करीत असतो, असे सांगून माने म्हणाले, भोजनाचा ठेका दिलेल्या ठेकेदाराकडून जेवण वेळेवर न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे त्या ठेकेदाराचा ठेका कायमस्वरूपी रद्द करावा. त्याला काळ्या यादीमध्ये टाकावे. शिक्षणाधिकारी चौगुले यांनी ठेकेदारास अंतिम नोटीस देऊन ठेका रद्द केला जाईल, असे सांगितले.
बलात्कारी, दारुड्या गुरुजींची हकालपट्टी करा
By admin | Published: December 30, 2015 1:01 AM