लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा ३ फेब्रुवारीला होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर सभा होत असल्याने विरोधक आक्रमक होणार हे निश्चित आहे. २०१९-२० च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे, या पत्रिकेवरील विषयावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
संघाची सर्वसाधारण सभा ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात व्हायची. मात्र, यंदा कोरोनामुळे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखान्याच्या गोडावून सभा घेतली जाणार आहे. ३ फेब्रुवारीला संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता सभा होत आहे.
‘गोकुळ’च्या मल्टीस्टेटवरून मागील सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली होती. मल्टीस्टेटवरून विरोधक व सत्ताधारी आमने-सामने आले होते. संघाची निवडणूक असल्याने मागील सभेत विरोधक आक्रमक होते. विषयपत्रिकेवरील पारंपरिक विषय असले तरी २०१९-२० या आर्थिक वर्षात मंजुरीपेक्षा जादा झालेल्या खर्चास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी हा विषय ठेवला आहे. यासह इतर विषयांवर जोरदार चर्चा होणार आहे. विरोधकांनी त्यादृष्टीने तयारी केली आहे.
सत्ताधाऱ्यांचीही तयारी
काेरोनाच्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. अशावेळी ‘गोकुळ’च्या माध्यमातून दूध व्यवसायाने सामान्य माणसाला तारले. दर दहा दिवसाला शेतकऱ्यांच्या हातात दुधाचे पैसे गेल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळाली, हा मुद्दा सत्ताधारी रेटण्याची शक्यता आहे.