संतोष बामणे -जयसिंगपूर --शिरोळ तालुक्याच्या आजूबाजूला शहरे, औद्योगिक वसाहती, नागरी विकास झपाट्याने वाढत असल्यामुळे त्याला पूरक व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढत आहे़ बांधकामासाठी लागणाऱ्या विटांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे उदगाव, चिंचवाड परिसरात विटांचे आगार बनले आहे़ या वीट व्यवसायासाठी लागणाऱ्या मळीच्या मातीचे नियमबाह्य उत्खनन सुरू असून पर्यावरणाची हानी होत आहे. याला कोण आवर घालणार असा प्रश्न शिरोळ तालुक्यातील नागरिक करीत आहेत़ उदगाव व चिंचवाड येथे माती उपसासाठी सन २०१३-१४ साठी ४० जणांना परवाना देण्यात आला होता़ यातील उदगाव येथे २९ व चिंचवाड येथे १२ तसेच २०१४-१५ साठी ४९ जणांना परवाने देण्यात आले होते़ यातील उदगाव येथे ४४ व चिंचवाड येथे ५ जणांना माती उत्खननासाठी परवाना देण्यात आले होते़ यातील परवानेधारकच माती उत्खनन करीत आहेत का, याची खात्री प्रशासन करीत नसल्यानेबिगर परवानाधारकही मातीचे उत्खनन करीत आहेत. त्याचबरोबर परवानाधारकही नियमबाह्य मातीचे उत्खनन करत असल्याचे सातत्याने समोर येत आहेत़ अनधिकृत माती उपसाप्रकरणी चिंचवाड हद्दीतील दहाजणांवर कारवाई करून ६ लाख ६८ हजार ८५० इतका दंड केला आहे, तर उदगाव हद्दीतील तेराजणांवर कारवाई करून ८ लाख १० हजार १५० रुपये दंड केला आहे़ त्याचबरोबर चिंचवाड येथील अनधिकृत माती उत्खननाबाबत सातजणांवर कारवाई करून ११ लाख ८४ हजार ५८० रुपये दंड वसूल केला आहे़ या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत माती उत्खनन केल्यामुळे लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे़ मात्र, नियमबाह्य माती उत्खननाची मालिका दिवसरात्र या परिसरात सुरूच आहे़ याकडे प्रशासनाने डोळ्यावर झापड ठेवून नियमबाह्य होत असलेल्या माती उत्खननाकडे दुर्लक्ष केले आहे़ सध्या मळी परिसरात रात्रं-दिवस हजारो ब्रास माती उत्खनन केले जात आहे़ दिवसाकाठी एक हजाराहून अधिक ट्रॉली मातीचे उत्खनन केले जाते़ येथील माती अंकली, धामणी, हरिपूर परिसरात नेऊन साठवणूक केली जात आहे़ सध्या ३०, ४०, ५० असे खोल स्वरूपात नियमबाह्य माती उत्खनन केले जात आहे़ याबाबत नियमबाह्य होत असलेले माती उत्खनन थांबवावे, असा आदेशही तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांना आले आहेत असे समजते; परंतु नियमबाह्य होत असलेले मातीचे उत्खनन का बंद होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ (उत्तार्ध) विजेचा टॉवर खचणारचिंचवाड येथील कृष्णा नदीकाठावरील मळी परिसरात नियमबाह्य माती उपसा करणाऱ्या लिलावधारकांनी टॉवरलगतच प्रमाणाच्या बाहेर नियमबाह्य खोलपर्यंत माती उत्खनन केल्यामुळे विजेच्या टॉवरला धोका निर्माण झाला आहे़ लाल व मळीकाठचा परिसर असल्याने जादा पाणी आल्यास हा टॉवर कोलमडण्याची शक्यता आहे़
उदगाव-चिंचवाडात नियमबाह्य उत्खनन
By admin | Published: April 11, 2016 12:27 AM