कोल्हापूर : बेस्ट ऑफ फाईव्ह सूत्र आणि अंतर्गत गुणांमुळे यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा कटऑफ वाढण्याची शक्यता आहे. मात्र, कटऑफ वाढला, तरी प्रवेशाची चिंता करण्याची गरज नाही. कारण, शहरातील उपलब्ध प्रवेश क्षमता १४८६० आहे. या तुलनेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८०६८ आहे.
शहरातील विविध ३५ महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य (मराठी, इंग्रजी), विज्ञान शाखेची एकूण प्रवेश क्षमता १४,६८० आहे. त्यासाठी गेल्यावर्षी १२,६९१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यामधील ९५८८ विद्यार्थ्यांना निवड यादीनुसार पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला होता. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये एकूण ६,८७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, तर ७,८०७ इतक्या जागा रिक्त राहिल्या. कोरोनामुळे यावर्षी दहावीची परीक्षा रद्द झाली आणि इयत्ता नववी, दहावीतील अंतर्गत गुणांच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर शहरातील नोंदणी केलेले सर्व ८,०६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, हे सर्वच विद्यार्थी अकरावीला प्रवेश होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीतील वाढीमुळे यावर्षी कटऑफ वाढला, तरी अकरावी प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नसल्याचे दिसून येते.
चौकट
अर्ज केला, तरी आयटीआय, पॉलिटेक्निकला प्राधान्य
महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरातील महाविद्यालयांना प्राधान्य देणाऱ्या करवीर तालुक्यातील ६,३६५, कागलमधील ४,०८३, राधानगरीतील २,६४७ आणि गगनबावडा तालुक्यातील ५३० विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे आयटीआय, पॉलिटेक्निक प्रवेशाला प्राधान्य देतात. त्यासह अकरावीसाठी अर्ज करून ठेवतात. त्यामुळे अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडील अर्जांच्या संख्येत वाढ दिसून येते.
चौकट
गेल्यावर्षी वाणिज्य इंग्रजीचा कटऑफ अधिक
विद्यार्थ्यांच्या कल आणि खुल्या प्रवर्गामध्ये एसईबीसी प्रवर्गातील १२ टक्के जागा वर्ग झाल्याने गेल्यावर्षी शहरातील अकरावीच्या विज्ञान विद्याशाखा आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशाचा कटऑफ तीन टक्क्यांनी वाढला. त्यात विज्ञानापेक्षा वाणिज्य इंग्रजीचा कटऑफ अधिक आहे. वाणिज्य इंग्रजी माध्यमाचा कटऑफ ९३.४० टक्के, विज्ञानचा ९३ टक्के, वाणिज्य मराठीचा ८३.२० टक्के, तर कला इंग्रजीचा ६९.२० आणि मराठी माध्यमाचा ६१.८० टक्के कटऑफ लागला आहे.
पॉईंटर
शाखानिहाय जागा
विज्ञान : ६०००
वाणिज्य मराठी : ३३६०
वाणिज्य इंग्रजी :१६००
कला मराठी : ३६००
कला इंग्रजी : १२०