आजरा : पगार सरकारचा घ्यायचा आणि कामे घरची करायची, कामाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असताना केवळ घरभाडे आणि पगारापुरते कामावर यायचे, असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही, असे संतापजनक उद्गार काढत आजऱ्याचे सभापती विष्णुपंत केसरकर यांनी सहायक गटविकास अधिकारी एस. एस. भोसले यांना चक्क सभागृहातून हाकलून तर लावलेच, त्याचबरोबर जोपर्यंत भोसले आजरा येथे राहत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पगार व घरभाडे न काढण्याचा ठरावही केला.आजरा पंचायत समितीची मासिक सभा सभापती विष्णुपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीसच पंचायत विस्तार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू झाली. धड विस्तार अधिकारी नाही आणि वारंवार सूचना करूनही सहायक गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. मुळातच भोसले हे कामावरच हजर नसतात, असा आरोप सभापती केसरकर यांनी करत कामे कुणी करायची? आम्ही केवळ सहीपुरतेच आहोत का? असे असेल तर कारभार अधिकाऱ्यांनीच चालवावा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. यावरून सहायक गटविकास अधिकारी भोसले व सभापती केसरकर यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. भोसले यांचा आवाज वाढताच त्यांना सभापतींनी आपण सभागृहात बसायचे नाही. तातडीने चालते व्हा, असे सुनावले. सभापतींचा आवेश बघून सारे सभागृह स्तब्ध झाले. भोसले सभागृहाबाहेर निघून गेले.त्यानंतर सभेमध्ये विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. एस. टी. आगाराकडून काही गाड्या ऐनवेळी रद्द केल्या जातात. अशावेळी प्रवाशांनी काय करायचे? असा प्रश्न दीपक देसाई यांनी केला. देवकांडगावला मुक्कामासाठी जाणारी गाडी रिकामी जात असेल तर एस. टी. आगार नफ्यात कसे येईल? असा उपरोधिक सवालही केला.जलसंधारण विभागाने चुकीच्या पद्धतीने सोहाळे बंधाऱ्यावर पाणी अडवण्यासाठी बरगे घातले आहेत. यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेलेच आहेत, पण त्याचबरोबर जलसंधारणच्या दुर्लक्षामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या गावात पाणीटंचाई उद्भवणार आहे. बंधाऱ्याची गळती काढण्याचे काम व बरगे टाकणे याची गुणवत्ता नियंत्रण विभागातर्फे तपासून चौकशीचा ठराव करण्यात आला.शाळांसह पडक्या अवस्थेत असणाऱ्या इमारतींचे निर्लेखनाचे प्रस्ताव वेळेत पाठवले जात नसल्याबद्दल सभापती केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली.सदस्या निर्मला व्हनबट्टे यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात करण्यात आलेल्या शेतीपिकांना नुकसानभरपाई मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला. सभेमध्ये पाटबंधारे, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालकल्याण, तालुका कृषी विभाग, शिक्षण, आरोग्य व पाणीपुरवठा विभागांचा आढावा घेतला.सभेस अनिता नाईक, तुळशीराम कांबळे, कामिना पाटील, आदी उपस्थित होते. उपसभापती दीपक देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)३0 रोजी वरिष्ठ समिती येणार आजरा तालुक्यातील संपूर्ण ७४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.याबाबतची वरिष्ठ समिती ३० तारखेला तालुक्याला भेट देणार असल्याचे गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांनी स्पष्ट केले. उचंगी येथील प्रकल्पग्रस्तांना गट नंबर दाखविण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पंचायत समितीच्या नूतन इमारतीत दोन वर्षांपासून कामकाज सुरू आहे. ६५ लाखांच्या फर्निचरचा प्रस्ताव आहे. फर्निचर जुनेच वापरले जात आहे. नवीन फर्निचर कधी येणार, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.स्वच्छतागृह फोडून टाकूइमारत बांधकाम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य नूतन इमारतीमधील स्वच्छतागृहास वापरले आहे, ते बादही झाले आहे. दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाला कल्पना देऊनही दुरुस्ती होत नाही. आता दगड टाकून स्वच्छतागृहातली भांडी फोडून टाकू, असे सभापती केसरकर यांनी सुनावले.
सहायक ‘बीडीओं’ची हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2016 11:41 PM