कोल्हापूर : महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सध्या कॉँग्रेसकडे ४४, तर भाजप-ताराराणी आघाडीकडे ३७ नगरसेवक (शिवसेनेच्या ४ सदस्यांचा पाठिंबा गृहीत धरुन) आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर ‘भाजप’चाच होईल, असे वारंवार सांगितल्यामुळे विशेषत: कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीबाबत उत्कंठा लागून राहिली आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने आघाडी केली आहे. या आघाडीला दोन अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. भाजप-ताराराणी आघाडीनेही या निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु त्यांना नऊ जागा कमी पडल्याने त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला; परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते काहीसे अस्वस्थ झाले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मोठी आमिषे दाखविली गेल्याची चर्चा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीसह कॉँग्रेसचे नेतेही नगरसेवकांना पक्षाशी एकनिष्ट राहण्याचे आवाहन करू लागले आहेत. भाजप-ताराराणी आघाडीचे नेते सत्तेसाठी फारच प्रयत्नशील आहेत. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेच्या नगरसेवकांसह ३७ इतके संख्याबळ आहे. भाजपचा महापौर करण्यासाठी केवळ चार ते पाच नगरसेवक त्यांना पाहिजे आहेत. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सरू आहेत. (प्रतिनिधी)
कोल्हापूर महापौर निवडणुकीत कमालीची चुरस
By admin | Published: November 09, 2015 11:53 PM