कोल्हापूर : गुलाबी थंडी सर्वांनाच धुंद करून टाकते. थंडीत फिरणे, कुरकुरीत मिरची भजी खाणे, कडकडीत चहा पिणे, गरमागरम तांबड्या- पांढऱ्यावर ताव मारणे सर्वांनाच आवडते. परंतु ज्यांना हाडांचे दुखणं आहे अशा व्यक्तींना थंडी म्हणजे एक शिक्षाच! नकोशी वाटणाऱ्या, वेदना देणाऱ्या थंडीमुळे बेजार व्हायला लागते. परंतु अशा थंडीत ज्यांना हाडांचे विकार आहेत त्यांना साधे साधे घरगुती उपाय करून काही अंशी का होईना वेदना कमी करता येऊ शकतात.
थंडी वाढली की सांधेदुखीचा आजार अधिकच डोकं वर काढतो. विशेषत: ‘वातरक्त’ आणि ‘आमवात’ यासारखे आजार आहेत, त्यांना थंडीत खूपच त्रास होतो. आपल्या आहारावर बरीच दुखणी अवलंबून असताता. थंडीमध्ये सतत मांसाहार किंवा अधिकाधिक गोड पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तवात होण्याची शक्यता असते. युरिक ॲसिडमध्ये खर (क्रिस्टल) तयार होतात. ही खर रक्तात विशेषकरून जेथे हाडांचे जॉईंटस् असतात तेथे अडकते आणि वेदना सुरू होतात. म्हणूनच आहार घेताना काळजी घेतली पाहिजे.
दुसरा आजार आमवात आहे. थंडीत पाणी पिण्याचे प्रमाण अगदीच अल्प असते. पाणी पिण्याचे टाळले जाते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की हाडांच्या जाईंटमधील तेलकटपणा कमी होतो. हाडांचा तेलकटपणा कमी झाला तर जाईंटमध्ये घर्षण वाढून हाडे दुखायला लागतात. म्हणून हा त्रास होऊ द्यायचा नसेल तर पिण्याचे पाण्याचे प्रमाण कायम उच्चतम ठेवावे.
- किमान तापमान २४ अंशांवर -
कोल्हापूरचेतापमान सध्या २४ अंशांपर्यंत खाली आहे. म्हणावी तितकी थंडी पडलेली नाही. परंतु सोमवारपासून पुढील रविवारपर्यंत ते १४ अंशांपर्यंत खाली जाणार आहे. त्यामुळे थंडीपासून अधिक सावधानता बाळगली पाहिजे, गरम कपडे, मोजे, बूट घातले पाहिजेत. झोपण्यापूर्वी पाय गरम पाण्यात ठेवा.
-दररोज व्यायाम करा -
रोज किमान चाळीस मिनिटे चालण्याचा तसेच शरीरातील सर्व जाईंटसची हालचाल होईल असा हलका व्यायाम केला पाहिजे. योगासने केली पाहिजेत. पाठीचे मणके, मानेचे मणके, कंबर, गुडघे यांची हालचाल होईल अशा प्रकारच्या योगासनाचे प्रकार करावेत.
व्हिटामिन डी आवश्यक -
व्हिटामिन डी ची शरीराला जास्त आवश्यकता असते. त्यामुळे अंडी, मासे, दूध यासारखे पदार्थ रोजच्या जेवणात असायला पाहिजेत. याशिवाय अतिरिक्त मात्रा म्हणून व्हिटामिन डीची औषधेसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली पाहिजेत.
थंडीच्या दिवसात खाण्यापिण्याच्या बाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे. व्हिटॅमिन डी जिवनसत्व मिळेल असे पदार्थ शक्यतो खावेत, गरम कपडे, मोजे वापरावेत, अती मांसाहार तसेच गोड पदार्थ खाण्याचे टाळावे - डॉ. विजय नागावकर
थंडीत सांधे आखडल्यासारखे होतात. गुडघे, कंबर, पाठीचे मणके, हाताची बोटे यात खूप वेदना होतात. काही काम करता येत नाही. थोडी सूज सुद्धा येते. - साधना दत्तात्रय पाटील, कोल्हापूर