कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्यावतीने सुरू असलेल्या सेवा सप्ताह कार्यक्रमांची सांगता रविवारी हरी ओम नगर येथील वरद विनायक गणेश मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण कार्यक्रमाने झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.गेले आठवडाभर रुग्णालये, गरीब वस्त्यांमध्ये फळे वितरण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण, वृक्षारोपण, दिव्यांगांना कृत्रिम उपकरणे असे विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात हा सेवा सप्ताह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी यशस्वी केला.आज हरी ओम नगर येथील वरद विनायक मंदिर येथे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, भाजपा गटनेते अजित ठाणेकर, नगरसेवक किरण नकाते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.भाजपा महिला मोर्चाच्यावतीने सरनाईक गल्ली (मरगाई मंदिर नजीक) शिवाजी पेठ येथे जिल्हा उपाध्यक्ष भारती जोशी यांच्या नियोजनाखाली मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण कार्यक्रम घेण्यात आला. भाजपा गटनेते अजित ठाणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत, अमित शिंदे, कविता पाटील, शोभा कोळी उपस्थित होत्या.
स्वामी स्वरूपानंद मंदिर, उत्तरेश्वर पेठ येथे झालेल्या मोफत डोळे तपासणी व चष्मे वितरणाच्या कार्यक्रमाचे नियोजन गौरी जाधव, सुनीता सूर्यवंशी, दीपाली खोत, समीक्षा कदम यांनी केले.