संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून राज्यात प्राध्यापकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, ठाणे, वाशिम आणि यवतमाळमधील महाविद्यालयात तास होत नसल्याने तेथील शिकविणे बंद आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि मराठवाड्यात आंदोलनाचा फारसा परिणाम झाला नसून, येथील महाविद्यालयात नियमितपणे तास होत आहेत.महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशनच्या (एम्फुक्टो) नेतृत्वाखाली राज्यातील प्राध्यापकांनी हे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एम्फुक्टो आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे एम्फुक्टोने आंदोलनाची तीव्रता वाढविली. या आंदोलनाला तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनीही पाठिंबा दिला आहे.कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अनुदानित महाविद्यालयांतील १२४३ प्राध्यापक आंदोलनात सहभागी आहेत. या जिल्ह्यांतील ८० टक्के महाविद्यालयांमध्ये तास होत नाहीत. नाशिक जिल्ह्यातील ८०० प्राध्यापक आंदोलनात सहभागी आहेत. अहमदनगरमधील प्राध्यापक आपआपल्या महाविद्यालयासमोर रोज निदर्शने करतात. वाशिम आणि यवतमाळमधील प्राध्यापकांनी ‘खडूफळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. ठाणे शहरातील ८० टक्के प्राध्यापक आंदोलनात सहभागी असल्याने येथील महाविद्यालयात वर्ग भरत नाहीत. मराठवाड्यात मोर्चा, सामूहिक रजा आंदोलनाद्वारे ते निषेध व्यक्त करीत आहेत. मुंबई विद्यापीठातर्फे पुनर्परीक्षार्थीं विद्यार्थ्यांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. पुणे शहरात आंदोलनाला अत्यल्प प्रतिसाद आहे. पुणे ग्रामीण, नगर भागात काही परिणाम जाणवत आहे.याठिकाणी एक-दोन दिवसांचे आंदोलनचंद्रपूर जिल्ह्यात ‘बेमुदत कामबंद’ आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शासनाचा निषेध करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत असलेल्या नंदुरबार, धुळे आणि जळगावमध्ये एक ते दोन दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. गडचिरोलीमध्ये दि. २५ आणि २६ सप्टेंबरला निदर्शने करण्यात आली. त्यानंतर नियमितपणे तासिका आणि महाविद्यालयांचे कामकाज सुरू आहे.
परीक्षेच्या तोंडावर सात जिल्ह्यांतील महाविद्यालये ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 11:59 PM