लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सोलापूरसह मराठवाड्यात झालेला चांगला पाऊस, त्यात एकाच मुकादमाने दोन-तीन वाहनचालकांकडून घेतलेल्या पैशांमुळे यंदा ऊसतोड मजुरांची टंचाई जाणवत आहे. कोल्हापूर विभागात २० टक्के मजूर न आल्याने साखर कारखान्यांपुढे खुद्द तोडीशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत स्थानिकचे ५९ हजार, परजिल्ह्यांतील एक लाख ३२ हजार; तर परराज्यांतील ११ हजार असे दोन लाख चार हजार मजूर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आहेत.
वाहनचालक काेयत्यांच्या संख्येनुसार मुकादमाशी करार करतात. कोयत्याला ३० ते ४० हजार रुपये ॲडव्हास दिला जातो. मागील हंगामात सुमारे अडीच लाख मजूर विभागातील कारखान्यांकडे होते. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट आल्याने हंगाम संपूनही त्यांना गावाकडे जाता येईना. या कालावधीत त्रास झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्यातच यंदा संपूर्ण राज्यात पाऊस चांगला झाल्याने मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यातील मजूर शेतीकामात गुंतले. करार झालेल्यांपैकी २० टक्के मजुरांनी पाठ फिरवल्याने यंदा कारखान्यांपुढे ऊसतोडणीचा पेच आहे. हंगाम पूर्ण क्षमतेने चालवताना कारखान्यांना कसरत करावी लागत आहे. यासाठी गावागावांत खुद्द तोड दिल्या आहेत. ज्याचा ऊस त्याने तोडून आणून द्यावा लागत आहे.
शेतकऱ्यांनाच कोयता घ्यावा लागणार
आगामी वर्षात ऊसतोड मजुरांचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. यासाठी ऊसतोडणी मशीन हा जरी उपाय असला तरी आपल्याकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे एकूण क्षेत्राच्या केवळ १५ टक्केच ऊसतोड मशीनद्वारे होऊ शकते. यासाठी आता शेतकऱ्यांनाच कोयता हातात घ्यावा लागणार आहे.
मजूर टंचाईची कारणे
पारंपरिक ऊसतोड मजुरांची मुले शिकल्याने ती या व्यवसायापासून दूर.
ऊसतोडणीच्या कष्टाचे कामाऐवजी इतर कामांकडे ओढा.
पाऊस-पाणी चांगले झाल्याने शेतीकामात गुंतले.
असे आहेत मजूर-
जिल्हा स्थानिक परजिल्ह्यांतील परराज्यांतील
कोल्हापूर ५२,४९८ ५९,५६२ ६,९३५
सांगली ७,१०९ ७३,०४१ ४,९८६
------------------------------------------------------
एकूण ५९,६०७ १,३२,६०३ ११,९२१
- राजाराम लोंढे