कोल्हापूर : रेल्वेच्या मालधक्क्यावर सुविधा नाहीत, त्यात हमाल नसल्याने मालाचा उठाव वेळेत होत नाही. परिणामी लाखो रुपयांचा दंड आकारला जात असल्याने आम्ही अडचणीत आलो आहे. सुविधा देऊन माल उठावाबाबत दंड आकारणी रद्द करा, अन्यथा काम बंद आंदोलन करू, असा इशारा कोल्हापूर हॅडलिंग अॅण्ड ट्रान्स्पोर्ट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदेत दिला.
रेल्वेच्या चार माल धक्क्यांपैकी दोन ठिकाणी माल उतरवला जातो; मात्र येथेही अर्धेच शेड आहेत; त्यामुळे निम्मा माल उघड्यावरच उतरवावा लागतो. रेल्वे प्रशासनाकडे अनेकवेळा मागणी करूनही ते दुर्लक्ष करीत आहेत.
‘कोरोना’च्या संकटातही जीव धोक्यात घालून आम्ही खताची वाहतूक केली. ‘कोरोना’च्या भीतीने आमच्याकडे असणाऱ्या ६०० हमालांपैकी केवळ १२५ हमाल कामावर आहेत; त्यामुळे खताचा उठाव लवकर होत नाही. त्यात रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्याभरात सिमेंट व धान्याच्या रेकला प्राधान्य दिल्याने खताच्या रेक येऊ शकल्या नाहीत. एकीकडे मजूर नाहीत, दुसºया बाजूला खते उतरून ठेवण्यासाठी शेडची व्यवस्था नाही आणि रेल्वे प्रशासन खत वाहतुकीकडे दुर्लक्ष करत आहे. अशा संकटात वाहतूक ठेकेदार अडकले आहेत.
खताची रेक आली आणि ती वेळेत मोकळी केली नाही तर रेल्वे प्रशासन तासाला ८७०० रुपये दंड करते. कमी मजुरांमध्ये रेक खाली करणे अवघड आहे. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी योगेश बलदोडा, नीलेश कलशेट्टी, दिनकर पाटील, महादेव भोसले, विकास जाधव आदी उपस्थित होते.
मे महिन्यात केवळ सहाच रेकसाधारणत: खरीप हंगामामुळे मे महिन्यात खताच्या १२ रेक येतात. यंदा मात्र रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे केवळ सहाच रेक आल्या. परिणामी, जिल्ह्यात अपेक्षित खते पोहोचली नाहीत. शेतकऱ्यांना खताची टंचाई जाणवल्याचा आरोप मोहन कलशेट्टी यांनी केला.
या आहेत प्रमुख मागण्या-
- रेल्वेच्या ३ व ४ प्लॅटफॉर्मवर कव्हर शेड उभी करा.
- किमान पावसाळा संपेपर्यंत दंडात्मक कारवाई थांबवा.