संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आदर्श हायस्कूल भामटेमधील गणित विषयाचे शिक्षक मच्छिंद्र रघुनाथ कुंभार यांच्या नवोपक्रमास राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. ‘फॅसिलिटेट मॅथेमेटिकल कन्सेप्ट वुइथ द हेल्प आॅफ सेल्फ-मेड इंटरॅक्टिव्ह अॅनिमेटेड फ्लिपबुक आॅफ नाइंथ स्टँडर्ड मॅथ्स पार्ट-वन’ या नवोपक्रमाने गणिताचे शिक्षण मनोरंजक, आनंददायी होणार आहे. त्यांच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबाबत कुंभार यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.प्रश्न : या नवोपक्रमाची कल्पना कशी सुचली?उत्तर : कोणत्याही शाळेतील विद्यार्थी असू दे, त्याच्या मनात गणित विषयाची भीती असतेच; मात्र, खरच हा विषय इतका भीतीदायक आहे, की शिकविण्याची पद्धती सदोष आहे, असे प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. त्यावर माझ्या हायस्कूलसह अन्य चार शाळांतील विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला. त्यातून माझ्या लक्षात आले, की खडू-फळा, तक्ते या पारंपरिक शिक्षण पद्धतीला विद्यार्थी कंटाळले आहेत. आजची पिढी बालपणापासूनच ‘टेक्नोसॅव्ही’ असल्याने त्यांना त्यांच्या पद्धतीनुसार शिक्षण देण्याची गरज आहे. ते लक्षात घेऊन मला अॅनिमेटेड फ्लिपबुक तयार करण्याची कल्पना सुचली.प्रश्न : ‘अॅनिमेटेड फ्लिपबुक’ची संकल्पना कशी आहे?उत्तर : इयत्ता नववीच्या गणित भाग एकच्या १३६ पानांच्या पुस्तकाचे ‘अॅनिमेटेड फ्लिपबुक’मध्ये रूपांतर केले. त्यामध्ये गणिताची उदाहरणे, स्वाध्याय, प्रश्नसंग्रह, गणित तज्ज्ञांची आॅनलाईन माहिती, परिपाठाची परिपूर्णता, आदींचा समावेश आहे. प्रत्येकी ६२ व्हिडीओ, आॅडिओ आहेत. फ्लिप्ड इमेजीस (सरकती चित्रे), ‘एसडब्ल्यूएफ’ इमेजीसचा वापर केला आहे; त्यामुळे गणिताचे शिक्षण हे मनोरंजक, आनंददायी बनले आहे. यासाठी मला सात महिने लागले. एक रुपयाचाही खर्च आला नाही. त्यासाठी मुख्याध्यापक दत्ता पाटील, सर्व शिक्षक सहकारी, जिल्हा तंत्रस्नेही टीमची मदत झाली.प्रश्न : या बुकचा उपयोग कसा होणार आहे?उत्तर : या बुकमध्ये ज्ञानरचनावादावरती गणितातील सर्व घटकांची रचना केली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण संकल्पना रुजविली आहे. ४५ मुलांना पहिल्यांदा पारंपरिक पद्धतीने आणि नंतर या फ्लिपबुकद्वारे शिक्षण दिले. त्यात फ्लिपबुकच्या माध्यमातून दिलेल्या शिक्षणाचा चांगला परिणाम दिसून आला. या बुकद्वारे शिक्षण दिल्याने गणिताबाबतची विद्यार्थ्यांमधील भीती दूर होणार आहे. त्यांना अध्ययनाची नवी दिशा मिळणार आहे. अभ्यासाबाबतची सक्ती हा प्रकार राहणार आहे.गणिताचीविशेष आवडसांगरूळ हे माझे गाव. न्यू कॉलेजमधून बी. एस्सी.ची पदवी घेतली. त्यानंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करण्याचे ध्येय होते; मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बी. एड. पूर्ण करून शिक्षक म्हणून काम करण्याचे ठरविले. खराडे कॉलेजमधून बी.एड.ची पदवी घेऊन सन २००३ पासून भामटे येथील आदर्श हायस्कूलमध्ये कार्यरत आहे.विविध ८० मोबाईल अॅपची निर्मितीकुंभार यांनी पहिली ते दहावीपर्यंतच्या गणित विषयाची ५५, इंग्रजी आणि मराठीची प्रत्येकी १0, तर विज्ञानचे पाच मोबाईल अॅप तयार केले आहेत. त्यांना टीचर इनोव्हेशन, इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इन स्कूल एज्युकेशन, सोशल मीडिया-महामित्र, आदी पुरस्कार मिळाले आहेत. दहावीच्या गणित भाग एक, दोन विषयांचे फ्लिपबुक करण्याचे त्यांचे ध्येय आहे.
हसत-खेळत गणिताचे शिक्षण घेण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:54 PM