मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये पहिली सिझर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, शहर व परिसरातील शेकडो गावांतील सर्वसामान्य रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला आहे. २५ ते ३0 हजार रुपये खर्च करावी लागणारी शस्त्रक्रिया आता ग्रामीण रुग्णालयात पूर्णपणे मोफत मिळणार आहे. ग्रामीण रुग्णालयात पहिलेच सिझर बाळंतपण झाल्याने कागल तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.मुरगूड येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले ग्रामीण रुग्णालय हे परिसरातील रुग्णांना नवसंजीवनीच ठरले आहे. मुरगूड येथील मारुती मेंडके यांची मुलगी शीतल अनिल संकपाळ (वय २३, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) ही माहेरी मुरगूडला बाळंतपणासाठी आली होती. त्यांना सोमवारी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी या स्त्रीला प्रसूती वेदना सुरू झाल्या; पण बाळाभोवतीचे पाण्याचे प्रमाण फारच कमी झाले होते. बाळाच्या मानेभोवती वारेचा तिढा पडल्याने बाळ व आई या दोघांच्याही जिवाला धोका निर्माण झाला होता. तब्बल दीड तास शस्त्रक्रिया चालली. यशस्वीपणे शास्त्रक्रिया पार पडली. डॉ. अमोल पाटील यांना भूलतज्ज्ञ डॉ. पल्लवी तारळकर, बालरोगतज्ज्ञ गणजित को. पार्डेकर, डॉ. स्वप्निल माळवदे, भगवान पाटील, आदींनी सहकार्य केले. या रुग्णालयात महाआरोग्य अभियानांतर्गत रुग्णांच्या उपचारासाठीचे मुबलक साहित्य रुग्णालयात उपलब्ध असून, गर्भपात, गर्भाशयातील पिशवी काढणे, शरीरावरील अनावश्यक गाठ काढणे, आदी शस्त्रक्रिया या रुग्णालयात केल्या जातात, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. वाय. तारळकर यांनी सांगितले.दरम्यान, यशस्वी शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी तालुका संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव भराडे, तालुका युवा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कळमकर, सदानंद पाटील, सागर कोंडेकर, किरण पाटील, साताप्पा सुतार, युवराज रामशे, संदीप रामाणे यांनी सर्व डॉक्टरांचा सत्कार केला. (वार्ताहर)
मुरगूड ग्रामीण रुग्णालयात सिझर शस्त्रक्रियेची सोय
By admin | Published: February 15, 2016 10:14 PM