महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकांना सामोरे, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 12:20 PM2023-07-13T12:20:20+5:302023-07-13T12:21:09+5:30
पक्ष संघटन मजबूत करीत असतानाच सामान्य, गोरगरिबांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याची सूचना
कोल्हापूर : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट व त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर झालेला परिणामाचा आढावा घेत आगामी काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांना सामाेरे जायचे आहे. त्यादृष्टीने बांधणी करा, अशी सूचना काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी दिल्या असल्याची माहिती काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या समवेत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी यांची मंगळवारी दिल्लीत बैठक झाली. यामध्ये तब्बल साडेतीन तास राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलण्याची संधी दिली. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट होऊन महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. परंतु या दोन्ही पक्षांतराबद्दल सामान्य माणसाच्या मनांत कमालीची चीड आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसची जबाबदारी जास्त वाढली आहे.
पक्ष संघटन मजबूत करीत असतानाच सामान्य, गोरगरिबांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याची सूचना राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. आगामी काळात महाविकास आघाडी म्हणूनच सगळ्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे, त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर काम करण्याची सूचनाही त्यांनी दिली. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने महाविकास आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केल्याने आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना ताकद मिळाली आहे. या तिघांनी चांगली मोट बांधली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते हवा निर्माण करू शकतात असा त्यांना विश्वास वाटत आहे.