आजरा : आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपापासून वंचित राहणार नाही. उसाचे कांड संपल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत याची खबरदारी घ्या, अशा सूचना आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांनी दिल्या. शिवसेनेच्या वतीने आजरा तालुक्यातील शिल्लक ऊस व टोळी मुकादमाकडून होणारी अडवणूक याबाबत आजरा तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयात सर्व कारखान्यांचे कार्यालय प्रमुख व शिवसेनेचे कार्यकर्ते यांची बैठक झाली. तालुक्यातील शिल्लक ऊस गाळपासाठी नेण्यासाठी तोडणी यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुद्द तोड करून ऊस दिल्यास वाहनांची व्यवस्था केली जाईल, अशी भूमिका कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी मांडली. १५ ते २० मार्चदरम्यान कारखाने बंद होणार आहेत. त्या अगोदर तालुक्यातील ऊस प्राधान्याने तोडला जाईल. ऊस टोळ्यांना शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत. मागणी केल्यास कारखाना प्रशासनाला कळवा. त्यांच्या बिलातून रक्कम वसूल करून शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उन्हाची तीव्रता वाढली आहे. शिरसंगी व भादवण येथील उसाला आग लागून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेवटचा ऊस तुटत नाही तोपर्यंत कारखाना बंद करू नका, असेही तहसीलदार अहिर यांनी सांगितले. ऊस घेऊन जाताना वाट अडविण्याचे प्रकार झाल्यास तातडीने कळवा, असे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सांगितले.
बैठकीला शिवसेनेचे संभाजी पाटील, युवराज पोवार, कृष्णा पाटील, शंकर संकपाळ यांच्यासह तांबाळे, संताजी घोरपडे, हेमरस, बेडकिहाळ, गडहिंग्लज कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.