संदीप बावचे
जयसिंगपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीचा गळीत हंगाम अनेक अडचणींतून पार पडला. यंदा तिसऱ्या लाटेच्या भीतीबरोबरच उसाचे आंदोलन, महापुरातील बुडीत ऊस, परतीचा पाऊस त्यातच ऊसतोडणी मजुरांचा ताळमेळ या संकटांना साखर कारखान्यांना सामोरे जावे लागणार आहे. गतवर्षीचा अनुभव पाहता येणाऱ्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी यंत्रणा वाढविली आहे. त्यामुळे मजूर कमी जरी आले तरी वेळेत ऊस तोडणी होऊन हंगाम पार पडेल, अशी अपेक्षा कारखानदारांची आहे.
गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोडणी मजुरांसाठी मुकादमांकडे करार करण्यासाठी वाहनधारक नियोजन करतात. बीड, सांगोला, परभणी, यवतमाळ, जालना या परिसरातून ऊसतोडणी मजूर येतात. गतवर्षी कोरोनामुळे मार्ग काढत कारखाने सुरू झाले होते. तरीदेखील करार करूनही ४० टक्के मजूर न आल्याने वाहनधारकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. अनेकांचे पैसे बुडाले. यंदाही राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे कारखाने देखील वेळीच सुरू होणार आहेत. ज्या भागातून मजूर येतात, त्याठिकाणीदेखील उसाचे क्षेत्र वाढले असून कारखाने देखील सुरू होणार आहेत. त्यामुळे आपल्या भागात राहूनच ऊसतोडणी करायची, अशी मानसिकता मजुरांची होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा कर्नाटकात एक महिना अगोदर कारखान्यांची धुराडे पेटतात. त्यामुळे त्या भागाकडे मजूर मोठ्या प्रमाणात जात असल्याचे चित्र दिसून येते. गतवर्षीचा अनुभव पाहता २० टक्के मजूर येणार नाहीत, असे गृहीत धरून कारखान्यांनी आतापासूनच नियोजन केले आहे. कमी मजुरांमध्ये ताळमेळ घालून तीस टक्के वाहनांची संख्या वाढविली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची अजूनही भीती व्यक्त होत आहे. तर महापुरामुळे दहा ते पंधरा टक्के ऊस पुराने बाधित झाल्यामुळे हंगामाचे दिवस कमी होणार आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम शेतकरी, वाहनधारक, ऊसतोड मजूर यासह कारखाना व्यवस्थापनाशी सांगड घालून पार पाडावा लागणार आहे.
बुडीत उसाचे आव्हान
महापुरामुळे बुडीत ऊस तोडण्याचे कारखान्यांसमोर आव्हान आहे. तर शेतकरीदेखील आपला बुडीत ऊस लवकर तुटून शेत रिकामे करण्याच्या मानसिकतेत आहेत. साखरेला चांगला दर असल्याने एकरकमीपेक्षा अधिक दर मिळावा, यासाठीदेखील ऊस दराचे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कारखान्यांकडून नियोजन
ऊसतोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे गतवर्षी कारखान्यांनी मशीनच्या साहाय्याने ऊसतोडणीचे नियोजन केले. येणाऱ्या गळीत हंगामात कारखान्यांनी ३० टक्के ऊस वाहतूक करणारी यंत्रणा वाढविली आहे. तोडणी मशीनची देखील संख्या वाढवावी लागणार आहे.