ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा -आजरा कारखान्याचा ‘दौलत’ कारखाना होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नेत्यांची दिशाभूल करणारी मंडळी वाढल्यामुळे कारखान्यात हुकुमशाही वाढीस लागली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार फुलविणारा कारखाना टिकविण्यासाठी सर्वांना सोबत आणि विश्वासात घेऊन कारखाना चालवू, अशी ग्वाही महाआघाडीचे नेते व माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी दिली.केसरकर म्हणाले, कारखाना हा तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. काटकसर व आर्थिक परिस्थिती विचारात न घेता निर्णय होऊ लागले, तर ते भविष्यात मारक ठरू शकते. गेल्या २० वर्षांत कारखान्याच्या वाटचालीचे आपण साक्षीदार आहोत. एक वर्ष अध्यक्षपदाची संधी मिळाली. आपल्या कारकिर्दीत गाळप चार लाखांवर केले. साखर उतारा १२.८० टक्के मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात २६०० रुपये इतकी रक्कम पडली. साखरेचे दर कमी असतानासुद्धा सर्व संकटांमधून कारखाना सावरला. चांगली दृष्टी ठेवून काम केले, तर काय होऊ शकते याचा अनुभव सभासदांनी घेतला. अनेक कर्मचारी कारखान्यात कायम नव्हते. त्यांना कायम करण्यात आले. एकीकडे असे असताना प्रत्येक गोष्टीत वरिष्ठांना विचारून त्यांच्या नावाचा वापर करून काही मंडळी कारखान्यात कारभारी बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच मंडळींनी सात वर्षे केवळ अध्यक्षपद अडवून बसलेल्यांना पुन्हा अध्यक्षपदाचे गाजर दाखवून जवळ केले आहे, अशा आघाड्यांवर शेतकरी सभासद विश्वास कसा ठेवणार? अध्यक्ष होण्याची घाई असणारी मंडळी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना कारखान्याच्या हिताशी काही देणे-घेणे नाही. आमच्या महाआघाडीने सामान्य शेतकऱ्यांपासून ते उच्चशिक्षित व उद्योजकांना उमेदवारी दिली आहे. भविष्यात शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करणे, ऊसाच्या चांगल्या बेण्यांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे, डिस्टिलरी प्रकल्प सुरू करणे, असे उपक्रम राबविले जाणार आहेत.गाळप प्रारंभ होऊन पाच वर्षांच्या आतच स्व. वसंतराव देसाई यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करणे, मल्टिस्टेटसारखे प्रकार अवलंबिणे, तसेच अभ्यासू सभासदांना सभासदत्वापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती कारखान्यात पुन्हा प्रवेश करू पाहत आहेत.आजरा कारखाना ही सभासदांची मालमत्ता आहे. त्या मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी विश्वस्त म्हणून संचालकांवर आहे. एकीकडे सहकारातील ज्येष्ठ अनुभवी मंडळी आपल्या आघाडीत असताना दुसरीकडे मात्र नीतिमूल्ये नसणारी मंडळी आहेत. एका विचाराने कारखाना चालविण्यासाठी सक्षम आघाडीद्वारे मतदारांसमोर जात असल्याने या निवडणुकीत श्री रवळनाथ स्व. वसंतराव देसाई विकास आघाडीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आघाडीचे नेते जयवंतराव शिंपी यांनी व्यक्त केला.शिंपी म्हणाले, संस्था वाढविणे व संस्था टिकविणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांना कारखाना चालविण्याचा मोठा अनुभव आहे. केवळ राजकारणातून आर्थिक अडवणूक झाल्याने आपणाला पाच वर्षांपूर्वी सभासदांच्या हिताच्यादृष्टीने अनेक निर्णय घ्यावे लागले. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे, जागेचा सातबारा काढणे याकरिता काम केलेल्यांपैकी आपण एक साक्षीदार आहोत. त्यामुळे कारखान्याचे धुराडे सतत पेटते राहण्यामागे ेआपला प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे.कारखाना उभारणीत योगदान असणारे कृष्णराव देसाई, मुकुंद आपटे, बापूसाहेब धुरे या संस्थापक व श्रीमती प्रभावती पोवार, राजारामबापू देसाई यांच्या मुलांना व समाजातील सुशिक्षित शेतकरी व उच्चशिक्षित मंडळींना सोबत घेऊन आघाडीची रचना केली आहे.कारखान्यात सहवीज प्रकल्प, डिस्टिलरी उपपदार्थ निर्मितीलाही प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न राहतील. ऊस विकास कार्यक्रम अधिक तत्परतेने राबविणे, तसेच उपलब्ध कर्मचाऱ्यांचा सक्षमपणे वापर करण्यास प्राधान्य राहील. येत्या सहा महिन्यांत किरकोळ अडचणींमुळे पूर्णत्वाकडे जात असलेले; परंतु अपूर्ण असलेल्या प्रकल्पांचा पाठपुरावा केला जाईल, यामुळे ऊस क्षेत्रात निश्चितच वाढ होईल. रात्रीत उगवलेले उद्योगपती आज वाटण्यासाठी आणि लुटण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहेत. सभासदांनी अनेक गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. आता त्यांना काहीतरी सांगून दिशाभूल व सोयीचे राजकारण करणाऱ्या मंडळींना सभासद बाजूला करून आपल्या आघाडीच्या बाजूने कौल देतील, असा विश्वासही शिंपी यांनी व्यक्तकेला.स्वत:च्या मर्जीप्रमाणे उमेद्वाऱ्या देऊन सहकारी कारखाना खासगी कारखान्याप्रमाणे चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता सभासदच अद्दल घडवतील.
कारखाना एका विचाराने चालविणार : जयवंतराव शिंपी
By admin | Published: May 19, 2016 10:14 PM