कोल्हापूर : गेल्या हंगामातील उसाला ४०० रूपयांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना साखर रोखण्याचे आंदोलन करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने यातून मार्ग काढण्यासाठी आज, गुरूवारी आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली. बैठकीत सर्वच साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी ऊस उत्पादकांना उत्पन्न वाटप सूत्रानुसार (रेव्ह्यून्यू शेअरींग फॉम्युला-आरएसएफ) पैसे देवू असे सांगत ४०० रूपये देण्यास नकारघंटा वाजवली. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी संघर्षाशिवाय शेतकऱ्यांना काहीही मिळणार नसेल तर ४०० रूपयांसाठी साखर रोखण्याचे आंदोलन आणखी तीव्र करू, एक कणही साखर बाहेर सोडणार नाही, असा खणखणीत इशारा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी राहूल रेखावार, प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे, उपसंचालक जी. जी. मावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने साखरेला प्रतिक्विंटल ३३०० रूपये दर ठरवून दिला आहे. पण प्रत्यक्षात कारखानदार जादा पैशांची खुल्या बाजारात साखर विक्री करीत आहेत. एफआरपी देवूनही कारखानदारांकडे पैसे शिल्लक आहेत. आता शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. यामुळे ४०० रूपयांच्या दुसऱ्या हप्त्याची मागणी केली आहे. या मागणीसाठीसाठी मोर्चा काढला. निवेदने दिली. तरीही कारखानदार काहीही बोलायला तयार नाहीत. म्हणून साखर अडवण्याचे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत आम्ही कायद्याचा आदर करून आंदोलन शांततेच्या मार्गाने करीत आहोत. कारखानदार पैसेच देणार नसतील तर प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागेल.
Kolhapur: उसाला चारशेच्या हप्त्याला कारखानदारांचा नकार, स्वाभिमानी आक्रमक; बैठक निष्फळ
By भीमगोंड देसाई | Published: October 12, 2023 3:20 PM