कोल्हापूर : देशातील राजकीय नेते, अधिकाऱ्यांच्या मोबाइल हॅकप्रकरणी कोणत्याही नेत्याने अजून भाष्य केलेले नाही, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना प्रसार माध्यमांसमोर एवढ्या लवकर येण्याची गरज काय होती, आपल्या राज्यातले विरोधी पक्षनेते एवढ्या तातडीने पुढे का येत आहेत, त्यांनीच फोन हॅक केले असतील आणि त्याची उत्तरे द्यावी लागतील म्हणून इतकी घाई केली असेल, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी लगावला.
ते म्हणाले, इस्रायलच्या एनएसओ कंपनीने दिलेले सॉफ्टवेअर जाऊन मोबाइल हॅक केले जाते त्यांची नावेही प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे विरोधकांनी लोकसभेचे कामकाज दोन दिवस बंद पडले होते. मोबाइल हॅक प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. आपल्या राज्यातले पाच अधिकारीदेखील इस्रायलला जाऊन आले, ते का गेले होते याची चौकशी शासन करेलच; पण रश्मी शुक्ला यांच्यामार्फत अनेक अधिकारी, राजकीय नेत्यांचे फोन हॅक करण्यात आले होते. याबाबत त्यांचीही चौकशी सुरू आहे.
----