कोेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या कोविड खरेदी घोटाळ्याबाबतची माहिती घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात लक्षवेधी मांडणार असल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेतील भाजपचे सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी मुंबईत भेट घेऊन त्यांना सर्व कागदपत्रे सुपूर्द केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील सोबत होते.
कोरोनाकाळात कोल्हापुरात जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ अमन मित्तल यांच्या सहअध्यक्षतेखालील शासकीय खरेदी समितीने ८८ कोटींचे कोविड साहित्य व औषधे खरेदी केली. ही बिले काढल्यानंतर अजून ४५ कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने चढ्या भावाने साहित्याची खरेदी केल्याचा संशय आल्याने सभागृहातील विरोधी सदस्य निंबाळकर यांनी याची माहिती मागवली. यातून हा घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेकडून झालेल्या अंतर्गत लेखापरीक्षणातही खरेदीतील त्रुटीवर बोट ठेवून काही रकमेची वसुली करावी, असा शेरा मारला आहे.
यावरून मंगळवारी निंबाळकर यांनी पत्रकार बैठक घेऊन घोटाळ्याची माहिती जाहीर केली. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मुंबईत जाऊन विरोधी पक्षनेते आमदार देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे सुपूर्द केली. यावर फडणवीस यांनी १५ मिनिटे सर्व माहिती घेऊन, फाईल वाचून अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यासाठी अध्यक्षांकडे प्रस्ताव देतो, असे सांगितले. याशिवाय या घोटाळ्याची व्याप्ती पाहता त्याची ‘कॅग’मार्फतच चाैकशी लावण्यासंदर्भातही केंद्रीय गृहमंत्र्याशी चर्चा करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
फोटो : ०४०३२०२१-कोल-राजवर्धन
फोटो ओळ: कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोनाच्या काळात झालेल्या कोविड साहित्य खरेदीच्या घोटाळ्याची कागदपत्रे सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती.