कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेचा भगवा आता संपला असल्याच्या आरोपाचा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी फडणवीस अशा प्रकारचे बेछूट आरोप करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना हा पक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा आहे. आजही या विचारावरच काम सुरू आहे. फडणवीस जबाबदार विरोधी पक्षनेते असल्यामुळे सरकारविरोधात टीका करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय राहिलेला नसल्याचा टोलाही देसाई यांनी लगावला.शिवसेनेचा कोल्हापुरातील दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंग हॉलमध्ये पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी मेळावा झाला. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे ह्यपुणे पदवीधरह्णमधून अरुण लाड, शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर या उमेदवारांना निवडून आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेतला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून प्रचाराचे नियोजन झाले आहे. तालुकानिहाय मेळावे घेतले जात आहेत. मतदानाची टक्केवारी जास्त करण्यावर महाविकास आघाडीचा भर आहे. समन्यवयाने, एका विचाराने काम सुरू आहे. यामध्ये शिवसेना आपली जबाबदारी ताकदीने पार पाडेल.देसाई म्हणाले...
- एस.टी.प्रमाणेच महावितरणबाबतही मदत देण्याचा सहानुभूतिपूर्वक विचार केला जाईल.
- कोरोनाची दुसरी लाट येईल, असे अपेक्षित धरून सर्व उपाययोजना केल्या आहेत.
- कोविड सेंटर तात्पुरती बंद केली आहेत.
- आवश्यक ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.
- परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासन सज्ज आहे.
- पालकांची संमती, रुग्णसंख्या कमी असेल तरच शाळा सुरू; जिल्हाधिकाय्रांना सर्वाधिकार
- १२ जणांच्या राज्यपालनियुक्त आमदार पदाबाबत राज्यपाल सकारात्मक विचार करतील.
- महिला सुरक्षा कायदा (दिशा ॲक्ट) प्रारूप स्वरूपात अंतिम टप्प्यात.
महाविकास आघाडीत निधीवरून वाद नाहीत.निधीवाटपात महाविकास आघाडीत दुजाभाव होत असल्याचे आरोप होत असल्याबाबत विचारले असता देसाई म्हणाले, प्रत्येकाला अधिकचा निधी मिळावा, अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे उद्योग-व्यवसायांवर परिणाम झाला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत अपेक्षित उत्पन्न जमा झाले नाही. निधी देण्यात दुजाभाव नसून महाविकास आघाडीत समन्वय आहे. मुख्यमंत्री सर्वांशी समतोल राखण्याचे आणि न्याय देण्याचे काम करीत आहेत.