दिंडनेर्ली : तलाठी, कोतवाल व मदतनीस यांनी घरात बसून जाणीवपूर्वक बोगस व चुकीची माहिती कळविल्याने शासकीय पेन्शन योजनेतून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने झाला असून, फेरसर्व्हे करून पुन्हा लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी, असा ठराव दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील ग्रामसभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महादेव पाटील उपस्थित होते. इस्पुर्ली येथे अपात्र लाभार्थ्यांची सुनावणी झाल्यापासून व दिंडनेर्लीतील जवळपास ४५० लाभार्थी अपात्र झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून दिंडनेर्लीतील वातावरण तणावपूर्ण झाले होते, अशा तणावपूर्ण वातावरणात ग्रामसभा पार पडली. अपात्र लाभार्थ्यांच्या फॉर्मवरती ओळख पंच म्हणून सह्या केल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य विलास बेडगे यांनी जाहीर माफी मागितली.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी अपंग सहाय, आदी योजनांसाठी जानेवारीमध्ये तलाठी कार्यालयाकडून लाभार्थ्यांची वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक माहिती मागविली होती. यादीत तेव्हाच्या तलाठी माधुरी जाधव यांनी स्वत: वैयक्तिक लक्ष न देता मदतनीस सुधाकर वायदंडे व दत्तात्रय मगदूम यांच्यावरती जबाबदारी सोपविली होती. तेव्हा या दोघांनी घरात बसून हेतूपुरस्सर बोगस माहिती दिली असून, कित्येक ठिकाणी लाभार्थ्यांच्या बोगस सह्या, अंगठे करून माहिती भरून दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच त्या सर्व्हेच्या फॉर्मवरती ओळख पंच म्हणून गावातील सरपंच महादेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलास बेडगे तसेच भगवान पाटील, कृष्णात डोंगळे यांच्या सह्या असल्याने गावातील वयोवृद्ध, अपंग ज्येष्ठ लाभार्थ्यांनी त्यांना ग्रामसभेत धारेवर धरल्याने सभेत खडाजंगी सुरू झाली. ज्या लाभार्थ्यांच्या फॉर्मवरती ज्या पंचांची सही आहे, त्या पंचांना वयोवृद्ध लाभार्थी जाब विचारत होते. यातूनच दत्तात्रय माने व कृष्णात डोंगळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. तसेच सदस्य संभाजी बोटे हे अपात्र लाभार्थ्यांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप कृष्णात डोंगळे यांनी केला. ग्रामसभेत पात्र उमेदवारांच्या यादीचे वाचन केले असता मदतनीस असलेल्या मगदूम याच्या आई, वडील व चुलते यांचा पात्र म्हणून सभावेश असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी मदतनीस वायदंडे व मगदूम यांना ग्रामसभेत आणण्याची मागणी केली; त्यामुळे गोंधळ उडाला. शेवटी या दोघांना चावडी कार्यालयात फिरकू द्यायचे नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला व त्याला सर्वांनी होकार दिला. ग्रामसेवक सचिन तारदाळे यांनी आभार मानले. ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
दिंडनेर्लीत अपात्र लाभार्थ्यांचा फेरसर्व्हे
By admin | Published: October 05, 2015 12:21 AM