वडणगे : आदिशक्ती हा शब्द पुराणामध्ये वारंवार ऐकायला मिळतो. विज्ञानाची परिभाषा आणि अध्यात्माची परिभाषा वेगवेगळी असली तरी त्याचा अर्थ एकच असतो. विज्ञानदेखील अशी गोष्ट आहे त्यामध्ये सिद्धता आहे. परखड अर्थाने ती मांडली जाते. अध्यात्मात कोणतीही गोष्ट सिद्ध झालेली नाही. तरीही त्याठिकाणी श्रद्धा असल्याने अध्यात्मवादी विज्ञानाला शक्यतो मानत नाहीत, असे विचार प्रा. एम. डी. देवर्डेकर यांनी मांडले.वडणगे (ता. करवीर) येथील लोकजागर मंचच्यावतीने आयोजित नवव्या व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ‘आदिशक्तीचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून जागर’ या विषयावर ते बोलत होते.
ते म्हणाले, आपण विज्ञाननिष्ठ आहोत, तुमच्या आमच्यात विज्ञाननिष्ठा ठासून भरलेली आहे, तरीही धार्मिक भावनेची श्रद्धा कोणाचीही कमी होत नाही, विमानाची स्वत:ची अशी परिभाषा असते. पारिभाषिक शब्दाला अनन्यसाधारण असे महत्त्व असते.आदिशक्ती म्हणजे महान उर्जा व दिव्यशक्ती असते. ही शक्ती जगाला निर्माण करते. विश्व हे महास्फोटातून निर्माण झाल्याचे विज्ञान सांगते; तर अध्यात्मातसुद्धा स्फोटातूनच जगनिर्मिती झाल्याचे सांगते. जितकी एनर्जी, उर्जा या आपल्या आदिशक्तीला मिळतात तिचे स्वरूप अध्यात्माने जाणलेले आहे. आदिशक्ती ही ईश्वरशक्तीची जाणीव आहे, तीच या ईश्वराची महानशक्ती असते.प्रास्ताविक व स्वागत आनंदराव नावले तर आभार मनोज गुरव यांनी मानले. यावेळी मंचचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विलास पोवार, उपाध्यक्ष एस. डी. जौंदाळ, प्रा. आनंदराव पोवार, पंडित तेलवेकर आदींसह मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.