एकनाथ पाटील-- कोल्हापूर जिल्हा हा अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. देशात होणारे अतिरेकी हल्ले तसेच विविध आंदोलने, दंगली रोखण्यासाठी कोल्हापूर पोलीस सक्षम आहेत का? याचे प्रात्यक्षिक घेतले जाते; परंतु प्रशिक्षणाचा अभाव, निष्काळजीपणा, अपुऱ्या साधनसामग्रीमुळे पोलिसांचा बनावट खेळ आता नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. अशा पद्धतीची रंगीत तालीम वर्षभरात नऊवेळा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्हा हा अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. जिल्ह्यातील अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, कणेरी मठ, खिद्रापूर, पन्हाळा, बाबूजमाल मस्जिद, राधानगरी, कोयना, चांदोली धरणे, आदी संवेदनशील स्थळे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. देशात होणारे अतिरेकी हल्ले तसेच विविध आंदोलने, दंगली, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी कोल्हापूर पोलीस सक्षम आहेत का? याचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी पोलीस दलातर्फे जिल्ह्यात वर्षभरात नऊ ठिकाणी रंगीत तालमी घेण्यात आल्या. नुकतेच इचलकरंजी येथे दंगल काबू प्रात्यक्षिकावेळी अश्रुधुराच्या नळकांडीचा स्फोट होऊन दोन शाळकरी मुलांसह पाचजण जखमी झाले. या घटनेवरून अशा गंभीर घटना रोखण्यासाठी कोल्हापूर पोलीस सक्षम नाहीत, हे स्पष्ट झाले. बॉम्ब निकामी करणे, दंगल काबूत आणणे, अतिरेकी हल्ल्यास प्रतिकार करणे याचे प्रात्यक्षिक यापूर्वी शहरातील विविध ठिकाणी घेतले गेले. प्रात्यक्षिक करताना त्याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली जाते. त्यामुळे ते जबाबदारीने प्रात्यक्षिक न करता निष्काळजीपणे करीत असतात. अनेक वेळा प्रात्यक्षिकावेळी अधिकाऱ्यांसह काही पोलीस कर्मचारी हसत असतात. आपण एक गंभीर आॅपरेशन आॅपरेट करीत असल्याचे त्यांना भानही नसते. त्यामुळे पोलिसांचा हा बनावट खेळ आता नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. पोलिसांचा खेळअचानक भरधावपणे सायरन वाजवित येणारा पोलीसगाड्यांचा ताफा, अग्निशामक दल, रुग्णवाहिका यांच्यामुळे रस्त्यावरील नागरिकांना धडकीच भरते. अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वॉकीटॉकीवरून घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा देताना तेथील वातावरण अतिशय गंभीर असते. नागरिकांना नेमके काय झाले, हे माहीत नसते. त्यामुळे ते श्वास रोखून पाहत असतात. तास-दीड तासाने एक अधिकारी येतो आणि ही रंगीत तालीम आहे, असे सांगून जातो. त्यावर नागरिक ‘हा पोलिसांचा खेळ’ म्हणून तेथून निघून जातात. इचलकरंजीमध्ये दंगल काबू प्रात्यक्षिकावेळी जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी सतर्कतेने काम केले पाहिजे. कर्तव्यामध्ये कसूर राहता कामा नये. येथून पुढे पोलिसांनी प्रात्यक्षिक करताना हलगर्जीपणा केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. - प्रदीप देशपांडे,पोलीस अधीक्षक बॉम्ब निकामी करण्याची यंत्रणा नाहीपोलीस दलामध्ये स्वतंत्रपणे ‘बॉम्ब शोध-नाशक पथक’ पोलीस मुख्यालय येथे कार्यरत आहे. या पथकाकडे बॉम्ब शोधण्याचे यंत्र आहे; परंतु तो निकामी करण्याची अत्याधुनिक यंत्रणा नाही. त्यासाठी पुणे येथील पथकाला पाचारण करावे लागते. काही वेळा कोल्हापुरातील पथकाला जीव धोक्यात घालूनच हे काम करावे लागते. जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रात्यक्षिक घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रथमत: बॉम्ब निकामी करण्याची यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करणे अपेक्षित आहे.
पोलिसांचा बनावट खेळ नागरिकांच्या जिवावर
By admin | Published: January 20, 2016 12:59 AM