कोल्हापूर/कळे : बंद पडलेले व्यवसाय, आर्थिक ओढाताण, देणेकऱ्यांचा तगादा... त्यातून बाहेर पडून झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी चौघांनी एकत्र येऊन थेट बनावट नोटांचा छापखाना सुरू केला. मात्र, पोलिसांच्या नजरेतून संशयितांच्या हालचाली फार काळ लपून राहिल्या नाहीत. बनावट नोटांच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आणि झटपट श्रीमंत होण्याचा डाव संशयितांच्या अंगलट आला आहे.पोलिस कोठडीत वाढअटकेतील संशयित संदीप कांबळे, अभिजित पोवार, चंद्रशेखर पाटील आणि दिग्विजय पाटील या चौघांची पोलिस कोठडीची मुदत संपताच त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीशांनी त्यांना पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे संशयितांचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला.
कर्जबाजारी संदीपला श्रीमंतीचे डोहाळेअनेक व्यवसायांमध्ये अपयशी ठरल्यानंतर कर्जाचा बोजा वाढलेल्या संदीप कांबळे (रा. कळे) याला श्रीमंतीचे डोहाळे लागले होते. देणेकऱ्यांचा तगादा आणि झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासातून संदीप बनावट नोटांच्या रॅकेटचा महत्त्वाचा भाग बनला. अभिजित पोवार आणि दिग्विजय पाटील यांच्या मदतीने त्याने स्वत:च्या घरातच नोटांचा छापखाना तयार केला. केवळ तीन ते चार हजार रुपये किमतीच्याच बनावट नोटा बाजारात खपवल्याचा दावा त्याने केला आहे. मात्र, त्याच्या दाव्यात पोलिसांना तथ्य वाटत नाही.
पडद्यामागचा सूत्रधार अभिजित पोवारगडमुडशिंगी (ता. करवीर) येथील अभिजित पोवार हा बनावट नोटांच्या गुन्ह्यातील पडद्यामागचा सूत्रधार आहे. त्याच्यावर २०१९ मध्ये गांधीनगर पोलिस ठाण्यात बनावट नोटांचा गुन्हा दाखल आहे. कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणि श्रीमंत बनण्यासाठी बनावट नोटा छापण्याचा सल्ला त्यानेच संदीप कांबळे याला दिल्याची माहिती पोलिसांच्या तपासात आली आहे. नोटांच्या छपाईसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठीही त्यानेच संदीपला मदत केली.
चंद्रशेखर पाटील रॅकेटचा कणाबनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटमधील चंद्रशेखर पाटील (रा. कसबा तारळे, ता. राधानगरी) याला राजकारणात करिअर करण्याचे वेध लागले होते. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तो स्वत:ला उमेदवारीचा दावेदार मानत होता. निवडणुकीत उधळण्यासाठी त्याला पैशांची गरज होतीच. दिग्विजय पाटील याच्या सांगण्यावरून चंद्रशेखरने संदीप कांबळे याला बनावट नोटा छापण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये दिले होते. त्यानेच काही बनावट नोटा ग्रामपंचायत निवडणुकीत खपवल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, अद्याप त्याने कबुली दिलेली नाही. राजकीय नेत्यांसोबतची ऊठबस आणि रूबाबामुळे तो राधानगरी तालुक्यात चर्चेत होता.
कारचालक दिग्विजय पाटीलही अडकलापुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील दिग्विजय पाटील हा चंद्रशेखर पाटील याच्या कारवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. रॅकेटमधील इतर तिघांना एकत्र आणण्यात त्यानेच महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचा आणि संदीपचा संपर्क होता. संदीपची गरज ओळखून त्यानेच इतर दोन संशयितांची भेट घडवली. सध्या हा केवळ आपण कारचालक असल्याचे पोलिसांना सांगत असला तरी, त्याचा रॅकेटमधील सक्रिय सहभाग पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.