सांगली : शहरातील दोन लोकांचे निधन झाले असताना ते जिवंत आहेत, असे भासूवन त्यांची बनावट ओळखपत्रे तयार करुन जमीन लाटल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीचा दस्त करतानाही मृत व्यक्ती याच असल्याचे सांगून बनावट व्यक्ती उभ्या करुन अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे.आनंदा भास्कर शेट्टी, नामदेव विठ्ठल वाघ, आयुब गुलाब सनदी व सुनील प्रकाश चौगुले (चौघे रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सांगलीतील निळकंठ कृष्णाजी द्रवीड व रघुनाथ द्रवीड या दोन व्यक्तींचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांची शहरात जमीन आहे. संशयित शेट्टी आणि वाघ या दोघांनी निळकंठ व रघुनाथ द्रवीड जिवंत असल्याचे भासवून जमीन लाटण्याचा कट रचला. त्यानुसार त्यांनी द्रवीड यांची बनावट ओळखपत्रे तयार केली. त्यांच्याकडून जमीन खरेदी करीत असल्याचा दस्त मुद्रांकावर करुन घेतला. जमीन खरेदीची नोंदणी करण्यासाठी ते २५ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील दुय्यम निबंधक कार्यालयात गेले. तिथे त्यांनी दस्त तसेच द्रवीड यांची ओळखपत्रे सादर केली. (प्रतिनिधी)ओळखपत्रावरुन बोगस व्यक्ती सापडल्याअधिकाऱ्यांनी त्यांना कृष्णाजी व रघुनाथ द्रवीड यांना हजर करण्यास सांगितले. त्यानुसार संशयितांनी द्रवीड यांच्या जागी दोन बोगस व्यक्ती उभ्या केल्या. ओळखपत्रावरुन या बोगस व्यक्ती द्रवीड असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. त्यामुळे काहीच संशय बळावला नाही. हा सर्व उद्योगक शेट्टी व वाघ यांनी केला. त्यांना सनदी व चौगुले यांनी मदत केली. गेल्या आठवड्यात द्रवीड यांचे नातेवाईक ही जमीन विकण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यावेळी ही जमीन दुसऱ्याच्या नावावर झाली असल्याचे समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांना पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी चौकशी करुन शनिवारी गुन्हा दाखल केला.
बनावट लोक उभे करुन मृत व्यक्तींची जमीन लाटली
By admin | Published: March 19, 2017 12:01 AM