कोल्हापूर : लोकशाही स्वातंत्र्य जपण्याची आवश्यकता आहे. जातींच्या आणि धर्मांच्या आधारावर आमच्यात फूट पडता कामा नये. जातीयवादी धर्मांध शक्तींचा आणि फॅसिस्ट हुकूमशाही कत्तलखोरांचा धुमाकूळ थांबविण्याची गरज आहे. अशा शक्तींचा बीमोड केल्याशिवाय आम्हाला, गुलामी संपूर्ण विकास समान विकास प्रत्यक्षात आणताच येणार नाही.
या शक्तींचा बीमोड करण्याची सामुदायिक शपथ बुधवारी घेण्यात आली. निमित्त होते निर्धार परिषदेचे.श्रमिक मुक्ती दल, निर्मिती विचारमंच आणि समविचारी संघटना यांच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त या निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही लोकशाहीर संभाजी भगत होते.
पाटणकर म्हणाले, देशात सर्वत्र सध्या लहान-मोठी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनांना अडथळे आणून ती मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत सामान्य जनता आपल्या हक्कांची आंदोलने थांबविणार नाही. जनतेचा विकास होण्यासाठी केवळ घोषणाबाजी नको; प्रत्यक्षात विकास होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
जातीय, धर्मांध ज्या शक्ती विकासाच्या आड येत आहेत, त्यांना आम्ही आडवे केल्याशिवाय गप्प राहणार नाही.संपत देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर अनिल म्हमाने यांनी आभार मानले. याप्रसंगी मोहन अनपट, मोहनराव यादव, वसंत पाटील, दिलीप पाटील, डी. के. बोडके, मारुती पाटील, दिलीप गायकवाड, नजर चौगुले, आनंदा मकर, आदी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाहिरी जलशाला उत्स्फूर्त प्रतिसादशाहीर संभाजी भगत यांनी, येणारा काळ वाईट आहे, विचार मारले जातील. बुद्धांनी युद्धविरोधी भूमिका घेतली. काही वेळात देशात धर्म उभा केला जातो. आपण पायाभूत काम केले पाहिजे, अशी भूमिका शाहिरी जलशाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडली. तिला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.