कोल्हापूर : त्यांचा दिवस सुरू होतोय सकाळी सहा वाजता आणि संपतोय मध्यरात्री एक-दोन वाजता. कोणी गणेशमूर्तीचे कास्टिंग करतंय, कोण मूर्ती रंगवण्यात मग्न आहे; कुठे मूर्तीचे बुकिंग सुरू आहे, तर सर्वांच्याच घरात रात्रीचा दिवस सुरू आहे. हे चित्र आहे कोल्हापुरातील कुंभारवाड्यांचे. गणेशोत्सवाला आता अवघे दहा दिवस राहिल्याने भक्तांचा लाडका देव साकारण्यात कुंभार बांधवांचे आख्खे कुटुंब गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहे.
वर्षभरापासून भाविक ज्या देवाच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहतात, त्या गणरायाच्या आगमनाला आता काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे, बाजारपेठेत लगबग आहे, मंडळांकडून उत्सवाची प्राथमिक तयारी सुरू आहे. एकीकडे भक्तांमध्ये ही धामधूम सुरू असताना तिकडे कुंभारवाड्यात रात्रीचा दिवस सुरू आहे. ज्या देवासाठी ही तयारी सुरू आहे, तो देव गणेशचतुर्थीला भक्ताच्या हाती सुपूर्द करण्यासाठी कुंभारांचे आख्खी कुटुंबे गणेशमूर्ती साकारण्यात गुंतली आहेत.
मंडळांच्या आणि घरगुती गणेशमूर्तींचे कास्टिंग आता पूर्ण झाल्याने त्यांच्या रंगकामाला सुरुवात झाली आहे. घरातील वयोवृद्ध आजी-आजोबा, लहान मुले, महाविद्यालयीन युवक-युवतींनीही या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. सकाळी लवकर घरातील कामे आटोपून सगळी पुरुष मंडळी व महिला मूर्ती रंगकामाला बसतात. लहान मुले शाळेतून आल्यानंतर मूर्ती रंगविण्यासाठी आणून देणे, ती परत नेऊन ठेवणे अशी लहानसहान कामे करीत आहेत; तर महाविद्यालयात जाऊन आल्यानंतर कुटुंबातील मुलं-मुलीही बारीक कलाकुसरीचे रंगकाम करीत आहेत. गणेशमूर्तीचे डोळे, किरीट, अलंकार, शस्त्र रंगविणे हे तसे हळुवार आणि लक्षपूर्वक करण्याचे काम असल्याने त्याबद्दल अधिक काळजी घेतली जाते.
कोल्हापुरातील शाहूपुरी, पापाची तिकटी, बापट कॅम्प या कुंभार गल्ल्यांमधील घराघरांत गणेशमूर्ती घडविण्याची लगीनघाई सुरू आहे. काहीजण अजूनही मूर्ती घडवीत आहेत. काहीजणांचे फिनिशिंग सुरू आहे; तर बहुतांश घराघरांत मूर्तींचे रंगकाम सुरू आहे. याशिवाय गणेशमूर्ती पाहायला आलेल्या नागरिकांना मूर्तीची माहिती देणे, पसंती असेल तर नाव लिहून ठेवून बुकिंग केले जात आहे.उघडिपीमुळे कामाला वेगजून महिन्यात सुरू झालेल्या पावसाने तीन महिने जोर धरला होता; त्यामुळे गणेशमूर्ती वाळण्यासाठी बरेच दिवस लागायचे. आता मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून सूर्याचेही दर्शन होत आहे. त्यामुळे तयार मूर्ती व रंगकाम केलेल्या मूर्ती पटकन वाळत असून मूर्तिकामाला वेग आला आहे.
फार कमी दिवस हाती राहिल्याने आमचे गणेशमूर्ती बनविण्याचे काम सकाळी सहा वाजता सुरू होते आणि मध्यरात्री एक-दोन वाजेपर्यंत सुरू असते. आम्ही शाडूच्या मूर्ती बनवीत असल्याने प्लास्टरच्या मूर्तींच्या तुलनेत आम्हाला थोडा जास्त वेळ लागतो; त्यामुळे अजूनही मूर्ती घडविण्याचे काम सुरू आहे. - सदाशिव वडणगेकर (मूर्तिकार)