आजरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम डावलून रस्त्यावर फिरणाऱ्यांच्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा परिस्थितीत आजरा शहरात आज एक कुटुंब रूग्णासोबत रस्त्यावर खासगी गाडी शोधण्याचा प्रयत्न करीत होती. त्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेवून प्रातांधिकारी डॉ. खिलारी यांनी त्यांना स्वतःच्या गाडीतून मडिलगे (ता. आजरा) येथे घरी सोडले. प्रशासनातील आगळ्या वेगळ्या माणुसकीचे दर्शन पाहून ते कुटुंब गहिवरले.मडिलगे येथील एक कुटुंब आपल्या चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी आजरा येथील अस्थिरोग डॉ. कुलदिप देसाई यांच्याकडे आले होते.त्यांच्या मुलग्याचा हाताला गंभीर दुखापत झाली होती. उपचार झाल्यानंतर हे कुंटुब खासगी गाडीच्या शोधात रस्त्यावर थांबले होते. पण प्रशासनाच्या कडक निर्बंधामुळे त्यांनाही कुठेही गाडी मिळत नव्हती. त्यामुळे त्यांची अवस्था दयनीय झाली होती.
दरम्यान, तेथून कारवाईसाठी निघालेल्या प्रातांधिकारी डॉ. खिलारी यांनी त्या कुटुंबातील सदस्याला हटकले.या वेळी ते कुटुंब अडचणीत असल्याचे निदर्शनास आले. डॉ. खिलारी त्या कुटुंबाची विचारपुस केली व मानसिक आधार दिला. स्वतःची गाडी त्यांना देवून चालकाला त्या कुटुंबाला त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविण्यास सांगितले. डॉ. खिलारी यांनी दाखवलेली माणुसकी पाहून त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले.