सचिन भोसले, कोल्हापूर :वडणगे (ता. करवीर) येथील रेश्मा माने हिने अल्पावधीतच महिला कुस्तीतील अनेक शिखरे पादाक्रांत करण्याचा सपाटा लावला आहे. नुकतीच तिने थायलंड (बँकाक) येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. या कामगिरीमुळे तिची आॅगस्ट २०१४ मध्ये चीनमध्ये होणार्या यूथ आॅलिम्पिकसाठी निवड झाली आहे. मात्र, तिचे लक्ष्य केवळ ‘आॅलिम्पिक’मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करून सुवर्णपदक पटकाविणे आहे. याकरीता तिच्या बरोबरच तिचे सारे कुटुंबच दररोज पहाटे चार वाजल्यापासून राबत आहे. अनेक घरात आजही मुलींना दुय्यम वागणूक मिळत असताना रेश्मा माने हिने बालवाडीतच लालमातीत शड्डू ठोकला तो कुटुंबीयांच्या पाठबळामुळेच. तिच्या यशासाठी आई कल्पना, वडील अनिल आणि भाऊ सचिन, युवराज, हृषीकेश आणि बहीण नम्रता हे सर्व सर्वजण धडपडत आहेत. शेतकरी असलेले वडील अनिल माने यांनी लहानपणी तिला पोहण्यास शिकवल्यानंतर दीड वर्षे जिम्नॅस्टिकचा सराव करून घेतला. त्यानंतरच कुस्तीच्या सरावासाठी घरातच छोटा आखाडा बांधून घेतला. ती सध्या प्रशिक्षक राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली गेली नऊ वर्षे शिवछत्रपती क्रीडा प्रबोधिनीत सराव करत आहे. तिची यूथ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्याने परदेशात व सोनपत (हरियाणा)मध्ये तिला भारतीय कॅम्प व विविध ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे तिला मदतीचा आधार देण्यासाठी प्रायोजक म्हणून मोठ्या संस्थानी पुढे येणे गरजेचे आहे. रेश्माचा सराव असा सकाळी ५ ते ८ व सायंकाळी ४ ते ७ असा ती सहा तास दररोज सराव करते. यामध्ये ४०० जोर, तितक्याच सपाट्या, दोन हजारांपेक्षा अधिक दोरीवरील उड्या, कुस्तीची तंत्रे, डाव आणि आठवड्यातून एकदा १५ कि.मी. धावणे, असा सराव ती करते. रोजचा आहार असा रेश्मास रोज मनुका, म्हाब्रा बी, गुरुबंधू थंडाई, जायदी खजूर, आक्रोड, मोसंबी ज्यूस, तसेच वेगवेगळ्या फळांचे ज्यूस, एक खडकी कोंबडीचे मटण, अंडी व तुपातील आहार दिला जातो. रोज किमान चार ते पाच लिटर दूध तिला दिले जाते.
कुटुंब राबतंय कुस्तीपटू रेश्माच्या ‘मिशन आॅलिम्पिक’साठी
By admin | Published: May 25, 2014 1:10 AM