कोल्हापूर : कोरोणा व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने ११ कुटूंब कल्याण केंद्रात गुरुवारपासून सर्व प्रकारच्या तापाची तपासणी सुरु केली आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकाऱ्यांना याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
कोरोणा व्हायरसची साथ वेळीच अटोक्यात आणण्यासाठी महापालिका जिल्हा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यांच्याकडून युध्दपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेचे हॉस्पीटल व नागरी कुटूंब कल्याण केंद्रामध्ये सर्व प्रकारचे ताप तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी सकाळी राजारामपुरी येथील आरोग्य केंद्रास भेट दिली. केंद्रामध्ये येणाºया नागरीकांना ताप, कोरडा खोकला अथवा सर्दीच्या रुग्णांची स्वतंत्र नोंद ठेऊन त्यांच्यावर उपचारासह योग्य ते मार्गदर्शन वैद्यकिय अधिकारी यांनी करावे. त्यांची सर्वेक्षणाप्रमाणेच विहित पध्दतीने नोंद करण्याच्या सुचना केली. तसेच नागरीकांनी सर्दी, खोकला, ताप आल्यास नजीकच्या कुटूंब कल्याण केंद्रामध्ये ओपीडीच्या वेळेत जाऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी केले आहे.
आयुक्तांनी पंचगंगा हॉस्पीटल नागरी आरोग्य केंद्र, सिध्दार्थनगर येथील नागरी आरोग्य केंद्र येथेही भेट दिली. यावेळी आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ.विद्या काळे, डॉ.शोभा दाभाडे, डॉ.सुनिल नाळे, डॉ.योगीता भिसे आदी उपस्थित होते.