कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला हा भ्याडपणाचे कृत्य आहे. नरेंद्र दाभोलकर आणि अॅड. पानसरे यांच्यातील हल्ल्यात साम्य दिसून येते. त्यामुळे यामागे धर्मांध शक्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा भ्याड हल्ल्यातून सर्व ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या शक्ती, प्रवृत्तींकडून सुरू आहे. मात्र, तो खपवून घेतला जाणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे सांगितले. चव्हाण यांनी हॉस्पिटलला भेट देऊन ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, विचारांची लढाई संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती वाढायला लागल्या, तर लोकशाही धोक्यात येईल. ज्यांनी पानसरे दाम्पत्यावर गोळ्या झाडल्या, त्यामागे ज्या प्रवृत्ती, सूत्रधार आहेत, ते जेरबंद झाले पाहिजेत. पानसरे यांना आलेल्या धमक्यांच्या पत्रांचा तपास झाला पाहिजे. पोलिसांना तपासकार्यासाठी सरकार मदत करावी. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. दरम्यान, चव्हाण यांनी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (प्रतिनिधी)
पानसरे हल्ल्यामागे धर्मांध शक्ती
By admin | Published: February 18, 2015 1:35 AM