कोल्हापूर : खत कंपन्या व वाहतूकदारांचा गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला भाडेवाढीचा तिढा अखेर शुक्रवारी सुटला. ७ टक्के भाडेवाढीचा निर्णय दोघांनीही मान्य केला. कृषी विभागाने केलेली शिष्टाई यशस्वी ठरल्याने शनिवारपासून खतांच्या वाहतुकीस सुरुवात होत असून, जिल्ह्यातील खतांची टंचाईही संपणार आहे.
वाढलेल्या डिझेल दराच्या पार्श्वभूमीवर वाहतूक भाड्यातही १० ते १२ टक्के वाढीच्या मागणीसाठी जिल्ह्यातील खत वाहतूकदार १ जुलैपासून संपावर होते. शंभर टक्के काम बंद असल्याने आरसीएफ वगळता सर्वच कंपन्यांकडून खतांचा पुरवठा थांबविण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनाही ऐन गरजेच्या वेळी खतांच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागले होते. रेल्वे वॅगनने या आठवडाभरात आणखी खत येणार आहे, ते येण्यापूर्वी वाहतुकीचा तिढा सुटला नाही तर शेतकऱ्यांपर्यंत खते पोहोचविण्यात अडचणी येणार असल्याने कृषी विभागाने याकडे विशेष लक्ष घातले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी खत कंपन्या, खत वाहतूकदार युनियन व एस. टी. महामंडळ यांच्या तीनवेळा बैठका घेतल्या. अखेर तिसऱ्या बैठकीत त्यांना यश आले.
कंपन्या ३ टक्केवर, तर वाहतूकदार १० टक्केवर ठाम होते. अखेर दोघांनीही थोडे थोडे सोसायचे असे ठरवून ७ टक्के भाडेवाढीवर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, वरणीवरून खत वाहतूकदार युनियनने पुन्हा यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला; पण कृषी विभागाने हा विषय दोन महिन्यांनंतर बघू असे सांगत आता ठरलेल्या तोडग्यानुसार वाहतूक सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कंपन्यांकडून खत पुरवठा येईल तसा तो संबंधित कृषी सेवा केंद्राकडे पाेहोच करण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून थांबलेला खत पुरवठा शनिवारपासून सुरळीत होत असल्याने कृषी सेवा केंद्र चालकांसह शेतकऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
खत वाहतूक बातमी चौकट
आमची मागणी १० टक्केची होती; पण फार ताणायचे नाही म्हणून ७ टक्के दरवाढ मान्य केली आहे. एक हजाराला ७० रुपये अशी ही वाढणार आहे. वाहतुकीचे किलोमीटरप्रमाणे टप्पे तयार केले असून, त्यानुसार ही वाढ होणार आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी लगेच वाहतुकीला सुरुवातही केली असल्याचे खत वाहतूक युनियनचे विजय कडवेकर यांनी सांगितले.