कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कोल्हापूर शहरात चिरमुऱ्याची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. इराणी खणीत शिस्तबध्द विसर्जन करण्यात आले. शहरातील पेठा व चौका-चौकात विसर्जन कुंड केले होते, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, तिथेही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मूर्ती दान केल्या.
इराणी खणीच्या सभोवती कनात बांधली होती. राजकपूर पुतळा मार्गावरील वाहतूक देशमुख हॉल चौकातून वळवण्यात आली होती. क्रशर चौकातून फक्त गणेश मूर्ती घेऊन येणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. खणीवर महापालिकेच्या यंत्रणेकडून मूर्ती गोळा करून त्या तराफावरून खणीत सोडल्या जात होत्या. दुपारी अडीचपासून बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिक इराणी खणीकडे येत होते. सायंकाळी पाचनंतर गर्दी वाढू लागली. मूर्ती ताब्यात दिल्यानंतर गर्दी कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय होती. सायंकाळी सातपर्यंत ही गर्दी कायम राहिली.
संभाजीनगर, शहाजी वसाहत, फिरंगाई, मिरजकर तिकटी आदी शहरातील प्रमुख चौकात विसर्जन कुंड करण्यात आले होते. येथेही नागरिक मूर्ती विसर्जित करून मूर्ती दान करत होते. यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
टेंपो, रिक्षा, दुचाकीतून बाप्पाला निरोप
टेंपो, रिक्षा, कार, दुचाकीतून आणून अनेकांनी बाप्पाला निरोप दिला. ढोल-ताशांचा गजर, चिरमुऱ्याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा अखंड जयघोष करत बालचमूंसह वयोवृध्द भक्तिमय वातावरणात विसर्जनासाठी आले होते.
पावसाने उघडीप दिल्याने सहकुटुंब विसर्जनासाठी
गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे बाप्पांचे विसर्जन कसे करायचे? असा प्रश्न भक्तांसमोर होता. मात्र मंगळवारी सकाळपासूनच पावसाची उघडीप राहिली. त्यात कोल्हापूर शहरात दिवसभर कडकडीत ऊन पडल्याने बाप्पाला निरोप देण्यासाठी सहकुटुंब आल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
बाप्पाच्या विसर्जनावेळी मास्कचा विसर
कोल्हापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिक काहीसे बिनधास्त झाल्याचे पाहावयास मिळते. गणपती विसर्जनावेळी अनेकांच्या तोंडाला मास्कच दिसत नव्हता.
इराणी खणीभोवती पोलिसांचे कडे
इराणी खणीला चोहोबाजूने कणात मारली होती. मूर्ती विसर्जनासाठी दोन मार्ग होते, पोलिसांनी विचारपूस केल्यानंतरच मूर्ती घेऊन खणीकडे जाता येत होते. खणीच्या सभोवती पोलिसांचे कडेे होते.