कोल्हापूर : कोविड संसर्गामुळे आलेले निर्बंध आणि कार्यकर्त्यांचा उत्साह याची सांगड घालत, कोल्हापुरातील तमाम गणेशभक्तांनी रविवारी भक्तिमय, तसेच शिस्तबद्ध रितीने आपल्या लाडक्या बाप्पांना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी मनोभावे आळवणी करत निरोप दिला. मोजक्याच कार्यकर्त्यांना इराणी खणीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी परवानगी देण्यात आल्याने, सुलभ आणि जलद गतीने मूर्ती विसर्जन सोहळा पार पडला. रविवारी उत्तररात्री पाऊण वाजता विसर्जन सोहळा आटोपला, तेव्हा १,०७२ सार्वजनिक मूर्तींचे तर १,८२२ घरगुती मूर्तींचे विसर्जन झाले होते.
सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गाचे सावट असल्याने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले होते. शासन आणि प्रशासनाने घालून दिलेल्या निकषात बसवून गणेशोत्सव साजरा करणे मंडळांच्या कार्यकर्त्यांना थोड जड गेले, परंतु गणेशावरील श्रद्धा व भक्ती कुठेही कमी पडून न देता, नियम पाळत नित्यपूजेसह संपूर्ण उत्सव साध्या पद्धतीने पार पाडला. अलोट गर्दी आणि अमर्याद उत्साहाचे प्रतीक बनून गेलेल्या विसर्जन सोहळ्यातही कार्यकर्त्यांनी साधेपणा दाखवून दिला.
या वर्षी मिरवणूक नसल्याने उद्घाटन सोहळा, तसेच मिरवणुकीतील सर्व प्रकारचा डामडौल टाळत सर्वच मंडळांनी आपापल्या सोयीने मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्या. काही मंडळांनी शनिवारी रात्रीच मूर्तींचे विसर्जन केले, तर काही मंडळांनी रविवारी सकाळी सातपासून विसर्जनाला सुरुवात केली. शहरातील, तसेच उपनगरातील शंभर टक्के मूर्ती या इराणी खणीत झाल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श पायंडा कार्यकर्त्यांनी घालून दिला. प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीवरच आणि तेही महाद्वार रोडवरूनच जाण्याचा आग्रह कार्यकर्त्यांना सोडून द्यावा लागला. त्यामुळे मिरजकर तिकटी, महाद्वार, पापाची तिकटी, गंगावेश अलोट गर्दीने गजबजणारा परिसरात शुकशुकाट होता. ही एक नव्या सुधारणावादाची, तसेच पर्यावरण जपण्याची सुरवात म्हणावी लागेल.
महानगरपालिका प्रशासनाने विसर्जनाची उत्तम व्यवस्था केली होती, तर पोलीस प्रशासनाने नियोजनबद्ध बंदोबस्ताची आखणी करून विसर्जनाच्या निमित्ताने होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविले. मात्र, शासनाने निर्बंध आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यांची सांगड घालताना, काही वेळा वादावादी, रेटारेटी, तसेच दमछाकही झाली, परंतु परिस्थिती संयमाने हाताळली गेली.