कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन (केएमटी ) प्रशासनाने आपल्या ताफ्यात १०४ नव्या कोऱ्या बसेस खरेदीसाठी संबंधित ठेकेदारास वर्कआॅर्डर दिल्याने बस खरेदी प्रक्रियेतील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. वर्कआॅर्डर दिल्यापासून पंधरा दिवसांत केएमटीने ९१ लाख रुपयांचा अॅडव्हान्स द्यायचा असून त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे सहीकरिता पाठविला आहे. महानगरपालिका परिवहन विभागास केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून १०४ बसेस खरेदी करण्याकरिता ४४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याकामी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याने अन्य शहरांकडे जाणाऱ्या या बसेस कोल्हापूर शहरात येण्याचा मार्ग येण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविताना परिवहन सदस्यांनी घेतलेल्या हरकतीमुळे निवडणूक आचारसंहितेत हे काम अडकते की काय, अशी शंका निर्माण झाली होती; परंतु कंपनीने या हरकतींचे स्पष्टीकरण दिल्यामुळे सदस्यांचेही समाधान झाले. आता सर्व अडथळे दूर झाले आहेत.केएमटीची सध्या आर्थिक स्थिती फारच बिकट आहे. त्यामुळे नवीन गाड्या ताफ्यात आल्याखेरीज केएमटी मार्गाचे पुनर्नियोजन करणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत केएमटीचा नवीन बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव आता मार्गी लागला आहे. एकावेळी १०४ बसेस खरेदी करण्याचा केएमटीच्या मागच्या ५० वर्षांतील हा पहिलाच प्रयोग आहे. (प्रतिनिधी)
केएमटी बसेस खरेदीचा मार्ग मोकळा
By admin | Published: August 31, 2014 12:16 AM