कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे अनेक वर्षे रखडलेले ‘शेतकरी भवन’ आज, बुधवारी खुले झाले. माफक दरात शेतकऱ्यांना राहण्यास मिळणार असून साडेदहा लाख रुपये खर्चून ‘शेतकरी भवन’सह मल्टिपर्पज हॉलही तयार करण्यात आला आहे. बाजार समितीत सोलापूर, नाशिक, अहमदनगर, सातारा, पुणे, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतून शेतकरी शेतीमाल घेऊन येतात. दोनशे-तीनशे किलोमीटरवरून प्रवास करून आल्यानंतर त्यांना रात्रभर उघड्यावर झोपावे लागते. यासाठी समितीचे ‘जुने शेतकरी भवन’ अद्यावत केले. त्यामध्ये चार स्पेशल खोल्या, आठ बेडचा कॉमन हॉल तयार केला असून, प्रति बेड ५० रुपये नाममात्र शुल्क आकारला जाणार आहे. लग्नकार्य, इतर कार्यक्रमांसाठी २५० खुर्च्यांची क्षमता असलेला अद्यावत हॉल तयार केला आहे. यासाठी सुमारे साडेदहा लाख रुपये खर्च करण्यात आले. त्याचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या हस्ते झाले. शिरापूरकर म्हणाले, ‘शेतकरी भवन’ समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हक्काचा निवारा आहे अजूनही समितीमध्ये अनेक सुविधा अपेक्षित आहेत. त्याच्या पूर्ततेसाठी प्रशासकांनी प्रयत्न करावेत. ‘शेतकरी भवन’ कामाचा आढावा घेत समितीचे प्रशासक रंजन लाखे म्हणाले, एकाचवेळी हॉलसह खोलीत सव्वाशे शेतकरी राहू शकतात, असे प्रशस्त व्यवस्था केली आहे. आगामी काळात समितीच्या आवारातील प्राथमिक सुविधा पूर्ण करण्यास प्राधान्य देणार आहे. कागल येथे पाच हजार टन क्षमतेची तीन गोडावून बांधली जाणार असून समितीचे उत्पन्नवाढीसाठी पेट्रोल पंपाची परवानगी ही पणन संचालकांकडे मागितली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, रस्ते आदी बाबींच्या पूर्णत्वासाठी विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही लाखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केवळ शेतकऱ्यांनाच प्रवेश!तुलनात्मकदृष्ट्या येथे राहण्याची सोय फारच कमी दरात आहे. ‘शेतकरी भवन’चा गैरवापर होऊ नये, यासाठी शेतीमाल आवक पावती किंवा अडते-व्यापारी यांचे पत्र आवश्यक राहील. सात-आठ महिन्यांपूर्वी तत्कालीन प्रशासक डॉ. महेश कदम यांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन ‘शेतकरी भवन’चे काम सुरू केले होते. त्यांच्या कालावधीत ९० टक्के काम पूर्ण झाले, पण आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांचा विसर पडल्याचे दिसले. याबाबत प्रशासकांकडे विचारणा केली असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात ‘शेतकरी भवन’ खुल
By admin | Published: January 07, 2015 10:02 PM