गारगोटी : कर्जास कंटाळून मडीलगे बुद्रुक (ता.भुदरगड) येथील शेतकऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. काकसो विष्णू पाटील-शेणवी (वय ६५) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दत्तात्रय पाटील यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे. आज, बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.अधिक माहिती अशी की, मडीलगे येथील काकासो पाटील यांच्यावर दत्तनागरी पतसंस्था, गावातील सोसायटी आणि निपाणी येथील फुलट्रॉन फायनान्स कंपनीचे असे एकूण अकरा लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांना चार दिवसांपूर्वी दत्त नागरी पतसंस्थेच्या कर्जाच्या वसुलीसाठी जमिनीच्या लिलावाचे पत्र आले. त्यावेळेपासून ते मानसिक तणावाखाली होते. आज सकाळच्या सुमारास घरातील सर्व जण कामानिमित्त शेतात गेली होती. घरात कोणी नसल्याने दुपारच्या सुमारास घरालगत असलेल्या कामत नावाच्या शेतात जाऊन विष पिऊन आत्महत्या केली. ते झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत दिसल्यावर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या घरच्यांना ही माहिती दिली.घरच्यांनी त्यांना उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, विष पिऊन संपवली जीवनयात्रा; मडीलगेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 6:19 PM