गडहिंग्लज : त्रास दिलेल्यांची नावे गोठ्यातील भिंतीवर कोळशाने लिहून ठेवून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. सिद्धेश्वर रामचंद्र कानडे (वय ३९,रा.औरनाळ बस थांब्याजवळ दुंडगे, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, औरनाळ बस थांब्यानजीक राहणाऱ्या सिद्धेश्वर कानडे हा शेतीबरोबरच भाजीपाला आणि फळे विक्रीचा व्यवसाय करीत होता. कर्जबाजारी झाल्यामुळे तो दारूच्या खूप आहारी गेला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्याची पत्नी मुलांसह माहेरी राहत होती.सोमवारी, दुपारी आई बाजारासाठी गडहिंग्लजला गेली होती. त्यावेळी घरी कुणी नसल्याचे पाहून त्याने राहत्या घरालगतच्या जनावरांच्या गोठ्यातील तुळईला दारूच्या नशेतच दोरीने गळफास लावून घेतला. दरम्यान,बाजार करून आल्यानंतर त्याची आई जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेली होती. त्यावेळी सिद्धेश्वर याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे. रावसाहेब कुरबेट्टी यांच्या वर्दीवरुन गडहिंग्लज पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे.
भिंतीवर नावं लिहून..!उत्तूर येथील दूध संस्था, गडहिंग्लज येथील महिलेसह दुंडगे व गडहिंग्लज येथील एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे सिद्धेश्वर याने गोठ्यातील भिंतीवर कोळशाने लिहून ठेवले असल्याची चर्चा घटनास्थळी होती.