म्हाकवे : काळम्मावाडी धरणाच्या निढोरी शाखेच्या उजव्या कालव्यातून म्हाकवे (ता. कागल) पर्यंत पाणी सोडले जाते; परंतु म्हाकवेतील २५ कि.मी. अंतराच्या पुढील शेतकऱ्यांना बऱ्याचवेळा पाणीच मिळत नाही. यासाठी येथील शेतकरी वारंवार निढोरी पाटबंधारे कार्यालयाकडे धाव घेतात. मात्र, या कार्यालयातील अधिकारी तुमच्यापर्यंत पाणी येत नाही हा विषय आमच्याकडे नाही. केवळ आम्ही पाणीपट्टी वसुली करतो, तर काही अधिकारी आमच्याकडे धरणातून ठरल्याप्रमाणे अमुक दिवस अमुक क्युसेस पाणी सोडण्याचे काम आहे आणि काही अधिकारी आम्ही मेंटनन्स करतो, तुम्ही कोल्हापुरातील कार्यालयातील आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जावा, असे डोस पाजून शेतकऱ्यांची केवळ बोळवण करण्याचेच काम करीत आहेत; परंतु येथील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याच्यादृष्टीने एकाही अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर दिले जात नाही.म्हाकवेपर्यंतच्या कालव्याला ठिकठिकाणी मोठमोठी गळती आहेत. तसेच अनेक ठिकाणी असणाऱ्या पोटकालव्यांना दरवाजेच नाहीत. त्यामुळे लाखो लिटर पाणी ओढ्या-नाल्यातून वाहून जाते, तर ज्या कालव्याला अस्तरीकरण केलेले नाही, तो कालवा फुटू नये यासाठी कमी क्षमतेने पाणी सोडले जाते. परिणामी या कालव्यातील पाणी म्हाकवे आणि त्यापुढील सीमाभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. दरम्यान, या कार्यालयाकडे अपुरे कर्मचारी आहेत. तसेच अधिकारीही प्रत्यक्ष कालव्यावर येऊन पाणी कुठेपर्यंत आले आहे, पाण्याला काही अडचणी आहेत का? पोटकालव्याची दारे नीट आहेत का? याची पाहणी करीत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन सर्वच शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)कालव्यातून पाणी न आल्याची तक्रार घेऊन गेल्यास या कार्यालयातील अधिकारी पाणीपट्टी दिली आहे का? अशी विचारणा करतात. त्यानंतर तुमच्यापर्यंत पाणी आले की नाही हे पाहण्याचे काम आमचे नाही, असे सांगून या अधिकाऱ्याकडे-त्या अधिकाऱ्याकडे जाण्याचे सल्ले देतात. त्यामुळे सर्वच शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. - विजय डाफळे, शेतकरी, म्हाकवे पाण्याचा बुडबुडा अन् वसुलीचा रेटाया कालव्यातून म्हाकवेपर्यंत आणि त्यापुढे कर्नाटकात पाणी सोडले जाते. त्यामुळे म्हाकवेतील सर्वच क्षेत्र लाभक्षेत्रात गृहीत धरून पाणीपट्टी वसुली केली जाते. आता तर जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या वसुलीची धडक मोहीम हाती घेऊन थकीत पाणीपट्टी संबंधित शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, म्हाकवेतील बहुतांशी शेतकऱ्यांना पाण्याचा बुडबुडाच दाखवून पाणीपट्टीची वसुली ही अन्यायकारक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
म्हाकवेतील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेतच...!
By admin | Published: April 26, 2015 11:18 PM