फलटण : साखरवाडी येथील न्यू फलटण साखर कारखान्याच्या थकीत ऊसबिलासंदर्भात ऊसउत्पादक शेतकरी शुक्रवारी पुन्हा आक्रमक झाले. कारखाना प्रशासनाने ५ सप्टेंबरपूर्वी ऊसबिल देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ते तात्पुरते स्थगित केले. प्रांताधिकारी, तहसीलदारांनी मध्यस्थी केल्याने आंदोलक शांत झाले.
साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याने २०१७-१८ या कालावधीत गळीतासाठी आलेल्या उसाचे पैसे न दिल्याने ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आले. व्यवस्थापनाकडून वारंवार केवळ आश्वासने मिळत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. हा असंतोष गुरुवारी तहसीलदार कार्यालय झालेल्या बैठकीत उफाळून आला.
ऊस उत्पादक शेतकºयांनी उसाचे पैसे मिळाल्याशिवाय आणि संचालकाविरोधात गुन्हे दाखल केल्याशिवाय न उठण्याचा पवित्रा घेत तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला होता. काहींनी आत्महत्येचा इशारा दिल्याने वातावरण तंग झाले होते. तहसीलदार विजय पाटील यांनी दूरध्वनीवरून प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्याशी ऊसउत्पादक आंदोलनसंदर्भात चर्चा केली. साळुंखे-पाटील यांनी शुक्रवारी संचालकांना चर्चेसाठी पाठवून देतो आणि कधी पेमेंट कधी मिळणार, हे लेखी स्वरुपात देतो, असे सांगितल्यावर आंदोलक शांत झाले होते.
ठरल्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या आवारात ऊसउत्पादक शेतकरी जमले. संचालक धनंजय साळुंखे-पाटील हे तहसील कार्यालयात आले. यावेळी प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी धनंजय पाटील यांच्याशी चर्चा करून आंदोलकांच्या भावना सांगितल्या.त्यानंतर सर्वजण बाहेरच्या आवारात ऊस उत्पादकांच्या सामोरे गेले.
यावेळी प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी ऊस उत्पादक शेतकºयांना कारखान्याने ५ सप्टेंबरच्या आत बिले देतो, असे आम्हाला सांगितले आहे. असे स्पष्ट करतानाच त्यांनी जर उसाचे पेमेंट केले नाही तर कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर मोलॅसिस जमीन आदी उत्पादनाची विक्री करून रक्कम वसूल करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिला.
धनंजय साळुंखे-पाटील म्हणाले, ‘कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकºयांचे पैसे देण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. कारखाना अडचणीत असल्याने आम्ही बरेच पर्याय शोधले; पण अनेक वेळा अडचणी आल्यामुळे उसाचे पेमेंट करता आले नाही.’
फलटण कृती समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, धनंजय महामुलकर, नितीन यादव यांनी पाच तारखेपर्यंत आंदोलन मागे घेत आहोत. या वेळेत उसाचे पेमेंट मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील..शेतकºयांची देय असलेली रक्कम कोणत्याही परिस्थितीत ५ सप्टेंबरच्या आत देणार आहोत. कारखाना व्यवस्थापन यासाठी प्रयत्नशील असून, कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या आणि व्यक्तींशी या संदर्भात बोलणे सुरू आहे. ऊस उत्पादक शेतकºयांना वेळेवर पेमेंट न मिळाल्याने त्यांना आलेल्या अडचणीची आम्हाला जाणीव आहे,’ असे धनंजय पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
फलटण तहसील कार्यालय परिसरात शुक्रवारी संतप्त ऊस उत्पादक शेतकरी जमा झाले होते. त्यांच्या प्रश्नांना धनंजय साळुंखे-पाटील यांनी उत्तरे दिली.