निपाणी : नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी निपाणी भागातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत शनिवारी चक्का जाम आंदोलन केले. धर्मवीर संभाजीराजे चौकात मानवी साखळी करून याचा निषेध करण्यात आला.
यावेळी बेळगाव जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राघवेंद्र नाईक म्हणाले, जाचक कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जाचक कृषी कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे.
राजू पोवार म्हणाले की, आंदोलक शेतकऱ्यांना सरकारकडून अशी वागणूक मिळणे ही बाब दुर्दैवी आहे. यावरूनच केंद्र सरकार हे शेतकरी विरोधीच आहे हे स्पष्ट होते.
यावेळी प्रसन्नकुमार गुजर, रमेश पाटील, सुखदेव मगदूम यांनीही केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
चक्का जाम आंदोलनामुळे धर्मवीर संभाजी चौकात वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी वाहतूक सुरळीत केली.
यावेळी आय. एन. बेग, एन. आय. खोत, कॉम्रेड दिलीप वारके, जरार खान पठाण, फारूक नागरजी, सुधाकर माने, झाकीर कादरी, सर्जेराव हेगडे, हाफिज मोसिन यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
०६ निपाणी आंदोलन
फोटो
निपाणी : नवीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून निपाणी येथे शेतकरी संघटनांनी आंदोलन केले.