गगनबावडा : ऊस शेती आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असूनसुद्धा ऊसाच्या सरीमध्ये पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था दिसून येते. त्यामुळे कित्येक ठिकाणी शेतकरी सर्रास पाचट जाळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान युगात ऊस शेती प्रगतीकडे वाटचाल करत आहे. तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी पाचट पेटवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सुरु असलेल्या शासनाच्या पाचट अभियानाला खो बसत आहे.
शेतीसाठी एक-आड सरी पाचट ठेवल्याने शेतीसाठी दोन-तीन टन एकरी सेंद्रिय खत प्राप्त होते. त्याचबरोबर पाण्याची व भागलनीची ५० टक्के बचत होते. जमिनीमध्ये गारवा निर्माण होऊन पीक वाढीसाठी वातावरण अनुकूल होते. तणासाठी मजुरीभरणी यामध्ये वेळ व पैसा या दोन्हीची बचत होते. तरीही शेतकऱ्यांमध्ये असणारे अज्ञान पाचट ठेवण्यास फाटा देत आहे. ऊसामध्ये पाचट ठेवल्यास उंदीर निर्माण होतात, पाला कुजत नाही, यासारख्या गैरसमजांमुळे शेतकऱ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण केला आहे तर उंदरांमुळे पाल्यामध्ये साप येतात, यासारखी कारणे शेतकऱ्यांमधून सांगितली जातात. त्यामुळे ऊस तोडल्याबरोबर शेतकऱ्यांमध्ये कृषी खात्याने मार्गदर्शन व पाचट ठेवण्याचे फायदे सांगूनही शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. चार वर्षांपूर्वी दुष्काळाच्या खाईत महाराष्ट्र लोटला होता, त्यावेळी पाण्याचा जास्त वापर होणाऱ्या ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाबरोबरच पाचट ठेवण्याची आवश्यकता आहे. पाचट ठेवल्याने शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत तयार होऊन जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते. जमिनीमध्ये ओलावा राहिल्याने पिके हिरवीगार दिसतात. त्याचा परिणाम होऊन रासायनिक खतांचा वापर कमी होतो. शेतकऱ्याचे आर्थिक बजेट सुधारण्यास मदत होते.