जयसिंगपूर : मोदी सरकार सत्तेत आल्यावर स्वामिनाथनच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला दीडपट हमीभाव देणार होते. मात्र सत्तेत आल्यावर सरकारने हमीभावातून कायमचेच मुक्त करण्याचा कायदा केला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
हरियाणा-राजस्थान बॉर्डरच्या शेतकरी आंदोलनात शेट्टी बोलत होते. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा रविवारी सतरावा दिवस असून, आंदोलनाचा जोर आणखी वाढत आहे. या आंदोलनावरून केंद्रातील भाजप सरकारची कोंडी झाली आहे.
सरकार कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आता शेतकऱ्यांनी देशभरात रेल्वे आणि दिल्लीला जाणारे सर्व महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली काॅर्पाेरेट जगताच्या दावणीला भारताची संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था बांधण्याचा मोदी सरकारचा डाव आहे; आणि त्यामुळेच कोणत्याही चर्चेविना सरकारने हे कायदे सभागृहात मंजूर केले आणि शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
आंदोलनात यावेळी योगेंद्र यादव, मेधाताई पाटकर, हानन मौला, अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, कविता कनगुटी, कॉम्रेड सत्यवान, आदी सहभागी झाले होते.
चौकट - जयपूर-दिल्ली महामार्ग बंद
शेतकरी दिल्लीकडे जाऊ नयेत म्हणून रस्त्यांवर खड्डे करण्यात आले आहेत. तरीही आंदोलक निकराचा लढा देत आहेत. जर मोदी सरकारच्या बेबंदशाहीला आळा घालायला अपयशी झालो तर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. राजस्थानमधून आलेल्या शेतकऱ्यांनी शहाँजानगाव येथे अडविल्याने जयपूर-दिल्ली महामार्ग बंद झाल्याने दिल्लीचे सर्व मार्ग बंद झाले असल्याचीही माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
फोटो - १३१२२०२०-जेएवाय-०२
फोटो ओळ - हरियाणा-राजस्थान बॉर्डर शेतकरी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी सहभागी झाले होते.