लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : वारणानगर येथील वारणा सहकारी साखर कारखान्याच्या चिटबॉयने बनावट उधारी खते दाखवून ४ लाखांची लूट केल्याची घटना उघडकीस आली. शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चिटबॉय निवास विश्वासराव जामदार (रा. भादोले, ता. हातकणंगले) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने ४ लाख रुपयांचा अपहार केल्यांचा प्राथमिक अंदाज आहे. हा प्रकार २०१८ पासून घडला होता. याप्रकरणी वडगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार तळसंदे येथे वारणा साखर कारखान्यात चिटबॉय म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे कारखान्याच्या सभासद व बिगर सभासद यांना रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, बी-बियाणे आदींचा पुरवठा रोख किंवा उधारीवर जबाबदारी होती. याबाबत पूर्वीचे सर्कल अधिकारी सतीश पाटील यांना तफावत आढळून आल्यामुळे जमादार यांच्याकडे चौकशी केली असता, १२ शेतकऱ्यांकडून बोगस उधारी पावत्या केल्याचे मान्य केले. यातून २ लाख ७४ हजार ९४६ रुपये घर खर्चाला वापरले.
या बाबतची फिर्याद कारखान्याचे सर्कल ऑफिसर वीरेंद्र गोविंदराव पाटील (रा. लाटवडे) यांनी दिली आहे. याबाबत दत्तात्रय तातोबा भोसले, मारुती बापूसो चव्हाण, संजय श्यामराव चव्हाण, धोंडीराम दौलू पाटील, सुभाष बापू मोरे, धैर्यशील अरविद शिंदे, मधुकर बाबुराव चौगुले, सुनीता बाबासो वांगीकर, अरुण वसंत मोकाशी, श्यामराव रामचंद्र चव्हाण (सर्व रा. तळसंदे) यांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार लेखी व तोंडी कारखान्याकडे केली होती. यांची पडताळी करून पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत.