श्रीकांत ऱ्हायकरधामोड- फराळे येथील रिलायबल शुगर अँन्ड डिस्टलरी पॉवर या कारखान्याने गेली पाच महिने चालू गळीत हंगामातील १५ जानेवारीनंतरच्या गेलेल्या उसाचे बील अद्याप अदा न केल्याने धामोड परिसरातील १५० शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे कारखाना प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्यासमोर व्यथा मांडली आहे.
ही बिले येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास कारखान्याच्या दारात बसून आंदोलन केले जाईल असे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना व कारखाना प्रशासनाला कळविले आहे .संबंधित थकित उसाच्या बिलाबाबत कारखाना प्रशासनाला वारंवार भेटून देखील कारखान्याकडून योग्य ती उत्तरे शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे व प्रशासनाने याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्यानेच शेतकरी लॉकडाऊनच्या काळात चांगलाच अडचणीत सापडला आहे. पारिणामी विकास सेवा संस्थांची मागील देणी थकीत राहीली आहेत. तर गेलेल्या ऊसाचे पैसेच मिळाले नसल्याने चालू हंगामातील पिकांना खते विकत घेणे अवघड झाले आहे.सहा महिने उलटून गेले तरी कारखाना शेतकऱ्यांचे पैसे देण्यास तयार नसल्याने धामोड परिसरातील त्रासलेला १५० शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला दोन दिवसापूर्वी चांगलाच दम भरला .व आठ दिवसात संबंधीत शेतकऱ्यांची ऊस बीले त्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात कारखाना प्रशासनाला कळवावे अशा आरायाचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहे .
कारखाना प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांची बिले अदा करावीत अन्यथा अंदोलन केले जाईल. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला कारखाना प्रशासन जबाबदार असेल. असेही निवेदनात म्हंटले आहे .यावेळी राधानगरी तालुका खादी ग्रामोद्योगचे उपाध्यक्ष भगवान खोत, धामोडचे माजी उपसरपंच बापूसो जाधव, शिवाजी कुरणे, दगडू चौगले, विश्वास पाटील, दिपक भामटेकर, अनिल जाधव, शेतकरी उपस्थित होते.